४० टक्के अपंगत्व असणाऱ्यांनाही पेन्शन
By admin | Published: April 4, 2016 11:53 PM2016-04-04T23:53:28+5:302016-04-04T23:53:28+5:30
‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत अगोदर दिव्यांगांना (शारीरिक अपंगत्व) घरे वितरित करण्यात येतील आणि त्यानंतर इतरांच्या अर्जावर विचार केला जाईल.
प्रमोद गवळी, नवी दिल्ली
‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत अगोदर दिव्यांगांना (शारीरिक अपंगत्व) घरे वितरित करण्यात येतील आणि त्यानंतर इतरांच्या अर्जावर विचार केला जाईल. याशिवाय ४० टक्के अपंगत्व असलेल्या लोकांनादेखील पूर्ण पेन्शन मिळेल आणि सर्व दिव्यांगांना संपूर्ण देशभरात मान्य राहील, असे सामान्य (युनिव्हर्सल) ओळखपत्र देण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री कृष्णपालसिंग गुर्जर यांनी महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमधून आलेल्या दिव्यांगांना दिले.
‘तुम्हाला (दिव्यांगांना) आपल्या मागण्यांसाठी पुन्हा दिल्लीत येण्याची गरज पडणार नाही, असे आश्वासन मोदी सरकारतर्फे मी देतो. तुमच्या समस्यांचे निराकरण केले जाईल. सध्या दिव्यांगांसाठी विविध विभागांतर्फे योजना राबविण्यात येत आहेत. त्या सर्व योजना एका छत्राखाली आणण्याची आवश्यकता आहे आणि सरकार हे काम अवश्य करेल,’ असे गुर्जर म्हणाले.
महाराष्ट्राच्या अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात किमान चार हजारावर दिव्यांग आपल्या विविध मागण्या घेऊन सोमवारी नवी दिल्लीत धडकले. आधी इंडिया गेटजवळ निदर्शने करण्याची त्यांची योजना होती. परंतु आ. कडू यांना केंद्र सरकारतर्फे चर्चेचे निमंत्रण मिळाल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. चर्चेचे निमंत्रण स्वीकारून आ. कडू सकाळी ११ वाजता शास्त्री भवन येथे पोहोचले. त्यांनी दुपारी २ वाजेपर्यंत राज्यमंत्री गुर्जर यांच्यासोबत दिव्यांगांच्या १९ मागण्यांवर चर्चा केली. त्यानंतर गुर्जर आणि कडू यांनी हिंदू महासभेच्या कार्यालयात थांबलेल्या दिव्यांगांना संबोधित केले.
‘गुर्जर यांच्याशी झालेली चर्चा सकारात्मक राहिली. गुर्जर यांनी दिव्यांगांच्या अनेक मागण्या मौखिकरीत्या मान्य केल्या. लेखी आदेश जारी करण्यासाठी सरकारला काही वेळ द्यावाच लागेल. त्यामुळे आम्ही हे आंदोलन सहा महिन्यांसाठी स्थगित करीत आहोत,’ असे कडू यांनी पत्रकारांना सांगितले.
आ. कडू म्हणाले, दिव्यांगांना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणारी पेन्शन आता त्यांच्या जन्मापासूनच दिली जाईल, असे आश्वासन गुर्जर यांनी दिले आहे. दिव्यांगांना ग्राम विकास विभागातर्फे पेन्शन दिली जाते, जे तांत्रिकदृष्ट्या अनुचित आहे. पेन्शन सामाजिक न्याय विभागातर्फे दिली गेली पाहिजे. त्यासाठी व्यापक पंजीकरण व्यवस्था आवश्यक आहे. त्यामुळे पेन्शन, पास, लायसन्स, शिक्षण, घर आदीबाबतच्या समस्या सहज सुटतील.
कोल्हापूरहून बाईकने आले!
कोल्हापूर जिल्ह्णाचे रहिवासी ६५ वर्षीय बलवंत पाटील हे आपल्या मोटारसायकलवर स्वार होऊन २४०० किलोमीटरचा प्रवास करीत नवी दिल्लीत पोहोचले. आपल्या देवाळे या गावाहून ३० मार्च रोजी दिल्लीला रवाना झालेले पाटील रविवारी दुपारी दिल्लीत दाखल झाले.