Ghaziabad News: कोरोनानं माणूस नव्हे, नातीही संपली; ना खांदा द्यायला कुणी, अस्थिही कुणी घेईनात!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 12:08 PM2021-05-29T12:08:46+5:302021-05-29T12:13:09+5:30
जेव्हा ते जिवंत होते तेव्हा खांद्याला खांदा लावून जगत होते. मुलांना बोट धरुन चालायला शिकवलं, खांद्यावर बसवून खेळवलं, आपल्या जवळच्यांचा विश्वास तुटू नये म्हणून जे हवं ते सारं केलं. पण कोरोना महामारीनं हे सारं संपुष्टात आणलं.
जेव्हा ते जिवंत होते तेव्हा खांद्याला खांदा लावून जगत होते. मुलांना बोट धरुन चालायला शिकवलं, खांद्यावर बसवून खेळवलं, आपल्या जवळच्यांचा विश्वास तुटू नये म्हणून जे हवं ते सारं केलं. पण कोरोना महामारीनं हे सारं संपुष्टात आणलं. कोरोनामुळे केवळ माणसाचा श्वास नव्हे, तर नातीही संपुष्टात आली.
ज्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालले एकत्र जगले त्यांना कोरोनानंतर कुणी खांदा देईनात. स्मशानातही माणसं जाण्यास घाबरू लागली. काही कुटुंब आपल्या घरातील सदस्यासाठी स्मशानापर्यंत पोहोचले पण त्यांच्या अस्थि घेण्यासाठी परत आलेच नाहीत.
ब्रजघाट गंगेच्या प्रवासात ४८ मृतदेह सापडले
ही संपूर्ण कहाणी आहे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे गंगेच्या प्रवाहात आढळलेल्या ४८ मृतदेहांची. त्यांनी गेल्या दीड महिन्यात कोरोना महामारीमुळे आपला जीव गमावला. यातील ३० जणांचं तर कुटुंबातील कोणताही सदस्य अंत्यसंस्कारासाठी परत आलाच नाही. बेवारस म्हणून त्यांची नोंद करुन अंत्यसंस्कार करावे लागले. यातील १८ जण असे होते की ज्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता.
त्यांच्या कुटुंबातील सदस्य अंत्य संस्कारासाठी आले पण त्यांच्या अस्थि घेण्यासाठी ते परत आलेच नाहीत. त्यामुळे प्रशासनानंच त्यांच्या अस्थि गंगेत विसर्जित केल्या. मोक्ष घाटचे संचालक आचार्य मनीष पंडित यांनी सांगितलं की त्यांनी एकूण ४८ मृतदेहांच्या अस्थि गंगेत विसर्जित केल्या आहेत.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत १५ एप्रिलनंतर रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यानंतर जिल्ह्यातील बहुतेक सराकीर आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता भासू लागली. ऑक्सिजनचा तुटवडा आणि उपचारांच्या अभावामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं.
एकवेळ तर अशी होती की रुग्ण रुग्णालयाबाहेर बेड रिकामी होईल यासाठी वाट पाहत उभा राहायचा आणि त्यातच त्याचा उपचारांअभावी मृत्यू होत होता. २१ एप्रिलपासून ते १० मेपर्यंत हिंडन मोक्ष स्थळावर परिस्थिती खूप बिकट होती. अंत्यसंस्कारासाठी रांग लागत होती. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ८ तास थांबावं लागत होतं.
एका दिवसात एका स्मशान भूमीत तब्बल ७० ते ८० जणांवर अंत्य संस्कार केले जात होते. त्यामुळे स्थानिक नगरपालिकेनं अंत्य संस्काराची प्रक्रिया देखील स्वत:च्या हातात घेतली. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांचं विविध स्मशानभूमीमध्ये वर्गीकरण केलं जाऊ लागलं.
सरकारी आकडे जरी मृतांची संख्या ४५० च्या जवळ असल्याचं सांगण्यात येत असलं तरी प्रत्यक्षात हा आकडा हजारापर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागातील माहितीनुसार मोठ्या संख्येनं दिल्ली आणि जवळच्या जिल्ह्यांमधील कोरोना संक्रमित व्यक्तींवरील अंत्यसंस्कार हिंडन नदीच्या घाटावरच करण्यात आले आहेत.