जगभरातील लोकांनी दरवर्षी स्वत:हून लॉकडाऊन करावे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 05:34 AM2020-04-13T05:34:39+5:302020-04-13T05:35:46+5:30
ख्यातनाम आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव : आत्मोन्नती, उत्कर्षासाठी कृती करण्याचे आवाहन
कोयम्बतूर : कोरोना विषाणूने आताच्या विश्वव्यापी साथीच्या निमित्ताने मानवी समाजास एक प्रकारे सन्मार्गच दाखवला आहे. त्यावरून धडा घेऊन जगभरातील लोकांनी विषाणूच्या भीतीने नव्हे तर आत्मोन्नती व उत्कर्षासाठी वर्षातून एकदा स्वत:हून तीन-चार आठवड्यांचे ‘लॉकडाऊन’ पाळावे, असे प्रतिपादन ख्यातनाम आध्यात्मिक गुरू व दिव्यदर्शी सद््गुरू जग्गी वासुदेव यांनी केले आहे.
त्यांच्या येथून जवळच असलेल्या ध्यानमंदिरात दैनिक ‘दर्शन’ कार्यक्रमात शनिवारी सायंकाळी बोलताना सद््गुरू म्हणाले की, अशा वार्षिक ‘लॉकडाऊन’मध्ये सर्व प्रदूषणकारी वाहने बंद ठेवावीत व प्रत्येक व्यक्तीने आपली आत्मिक, भावनिक, शारीरिक व आध्यात्मिक शक्ती व जे काही काम करत असाल त्यातील कार्यक्षमता किमान १० टक्क्यांनी कशी वाढविता येईल, याचे चिंतन करावे. यामुळे पृथ्वीचे असंतुलित पर्यावरण तर सावरेलच शिवाय दर १० वर्षांनी दुप्पट कार्यक्षमतेचा ‘मानवीय’ समाज तयार होऊन पृथ्वीवर नंदनवन अवतरेल, अशा स्वयंस्फूर्तीच्या वार्षिक ‘लॉकडाऊन’वर जगभरात मतदान घेतले तर लोक त्याला नक्कीच बहुमताने पाठिंबा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सद््गुरू म्हणाले की, अशा प्रकारची महामारी हा मानवाला परमेश्वराने दिलेला शाप आहे, असे काही धर्मगुरू सांगत आहेत. परंतु, आपण तसे मानत नाही. सर्व पृथ्वी फक्त आपल्याच उपभोगासाठी आहे व इतर चराचर सृष्टी आपल्या सेवेसाठी आहे, असा घातक भ्रम माणसाने करून घेतल्याचा हा परिणाम आहे.
अगदी सुक्ष्म जीवापासून कोणत्याही सजीवाचा अधिवास धोक्यात आला तर तो आत्मरक्षणासाठी इतर सजीवांच्या अधिवासात शिरकाव करणार, हा निसर्गाचा नियमच आहे.
मानवाने सृष्टीकडे पाहण्याचा आपला आत्मकेंद्रीत दृष्टिकोन बदलला नाही तर ते विनाशाला निमंत्रण ठरेल. सद््गुरू म्हणाले की, संपूर्ण चराचर सृष्टी परस्परावलंबी आहे. पृथ्वीवर माणूस अवतरलाही नव्हता तेव्हाही असंख्य सजीव होते व माणूस नसला तरीही ते टिकून राहणार आहेत. माणूस अन्य सजीवांशिवाय जगू शकत नाही, पण इतर सजीवांचे माणसावाचून काही अडणार नाही.
कोरोना विषाणू सद््गुणी
अन्य विषाणूंच्या तुलनेत हा कोरोना विषाणू खूपच सद््गुणी आहे, असे थट्टेने सांगताना सद््गुरु म्हणाले की, पूर्वीच्या काही भयावह विषाणूप्रमाणे हा कोरोना विषाणूही अन्य कोणत्या सजिवांतून पसरणारा असता तर, हल्लीच्या अतिजलद वाहतूक साधनांच्या युगात त्याला रोखणे महाकठीण झाले असते. परंतु, सुदैवाने हा विषाणू माणसाकडून माणसात पसरणारा आहे. त्यामुळे त्याचा प्रसार होऊ न देणे हे सर्वस्वी माणसाच्या हातात आहे. शिवाय यापूर्वी येऊन गेलेल्या ब्युबॉनिक प्लेग व स्पॅनिश फ्ल्यू या साथींच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी त्याची प्रा़णघातकता कमी आहे, हीदेखील एक दिलासा देणारी बाब आहे.