'लोक कोरोनाला कंटाळले; आम्ही 10 कोटी डोस फेकून दिले', अदार पूनावाला यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 02:05 PM2022-10-21T14:05:42+5:302022-10-21T14:06:26+5:30
Covishield Doses Dumped: लोकांनी बूस्टर डोस घेतला नाही, त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला 10 कोटी डोस फेकून द्यावे लागले.
Corona Vaccine: 2020 आणि 2021 हे दोन वर्ष भारतासह जगभरातील लोकांवर मोठे संकट घेऊन आले होते. कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला होता. पण, 2022च्या पासून कोरोना कमी-कमी होत गेला. आता अशी परिस्थिती झालीये की, लोक कोरोनाला घाबरत नाहीत. यामुळेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच कोविशील्ड लसीचे उत्पादन थांबवले होते.
10 कोटी डोस फेकून दिले
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि सीईओ आदर पूनावाला म्हणाले की, कोरोनाची लाट संपली अन् नागरिकांमध्ये कोरोना लसीकरणाबाबत तसेच बूस्टर डोसबाबत उदासीनता आहे. आम्ही डिसेंबर 2021 मध्ये कोविशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन थांबवले. तरीही कोविशिल्ड लसीचे 10 कोटी डोस कालबाह्य झाल्याने वाया गेले, अशी अदर पूनावाला यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
कोरोना प्रतिबंधक लसीपेक्षा फ्लू लसीकरणाविषयी अधिक उदासीनता आहे. दरवर्षी किंवा दर दोन वर्षांनी कोरोना आणि फ्लूची लस नियमितपणे घ्यावी लागेल. तसेच कोव्हॅक्सिनचा वापर बूस्टर म्हणून करण्यास 10-15 दिवसांत मान्यता मिळण्याची शक्यता आहे, असेही पूनावाला यांनी सांगितले.
'यूएस फर्म Codagenix सोबत काम करत आहे'
ओमायक्रॉन व्हेरिएंटविरोधात लस विकसित करण्याच्या सीरमच्या प्रयत्नांवर पूनावाला म्हणाले की, कंपनी यासाठी अमेरिकेच्या नोव्हावॅक्सशी भागीदारी करत आहे. आमची कोवोव्हॅक्स लसीची चाचणी केली गेली आहे. येत्या 10-15 दिवसांत बुस्टर शॉटला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सीरम सध्या अमेरिकन फर्म कोडाजेनिक्ससोबत सिंगल-डोज इंट्रानेसल कोविड लसीवर काम करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
'कोरोनाशी लढण्यासाठी रणनीती आखणे आवश्यक'
डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, एक्सबीबी, ओमायक्रॉनच्या उपप्रकारांमुळे आणखी एका लाटेचा सामना करावा लागू शकतो. आतापर्यंत कोणत्याही देशाकडून नवीन उपप्रकाराची माहिती मिळालेली नाही. या प्रकारांमुळे गांभीर्य निर्माण होऊ शकते. त्यामुळे अगोदरच कोरोनाशी लढण्यासाठी रणनीती बनवणे आवश्यक आहे.