लाेक ‘तारीख पे तारीख’ला कंटाळले, त्यांना हवी तडजाेड...; लोक अदालत सप्ताहात सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 06:26 AM2024-08-04T06:26:39+5:302024-08-04T06:27:43+5:30
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढे सांगितले की, लोक अदालत स्थापन करण्यात मला बार आणि बेंच असे सर्वांकडूनच खूप पाठबळ मिळाले. न्यायप्रक्रिया व्यापक व्हावी, यासाठी लोक अदालतीच्या प्रत्येक पॅनलवर २ न्यायमूर्ती आणि २ बारचे सदस्य राहतील, याची आम्ही खबरदारी घेतली.
नवी दिल्ली : लोक न्यायालयीन प्रकरणांना एवढे कंटाळले आहेत की, त्यांना आता केवळ तडजोड हवी आहे, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी केले.
सर्वोच्च न्यायालयात आयोजित विशेष लोक अदालत सप्ताहानिमित्ताने सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले की, लोक न्यायालयीन प्रकरणांना एवढे कंटाळले आहेत की, त्यांना कोणतीही तडजोड हवी आहे. बस्स, न्यायालयापासून आम्हांला दूर करा, एवढेच त्यांचे म्हणणे आहे. न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे एक शिक्षाच असून, ही बाब आपणा सर्वांसाठीच चिंतेची आहे. लोक अदालत हा तडजोडीसाठी उत्तम पर्याय आहे, असे चंद्रचूड म्हणाले.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढे सांगितले की, लोक अदालत स्थापन करण्यात मला बार आणि बेंच असे सर्वांकडूनच खूप पाठबळ मिळाले. न्यायप्रक्रिया व्यापक व्हावी, यासाठी लोक अदालतीच्या प्रत्येक पॅनलवर २ न्यायमूर्ती आणि २ बारचे सदस्य राहतील, याची आम्ही खबरदारी घेतली. मी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून देशभरातून अधिकारी आणण्याचा प्रयत्न केला आहे.
सुरुवातीला सात पीठांपासून लोकअदालतीला सुरुवात करण्यात आली होती. आम्ही यशस्वी होऊ काय, याबाबत आम्ही साशंक होतो. गुरुवारपर्यंत १३ न्यायपीठे झाली असून, त्यांच्याकडे भरपूर काम आहे. न्याय लोकांच्या घरापर्यंत घेऊन जाणे हा लाेक अदालतीचा हेतू आहे. प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करणे हाही त्यामागील एक उद्देश आहे. - डी. वाय. चंद्रचूड, सरन्यायाधीश
पहिली लोकअदालत भगवान श्रीकृष्णाने आयोजित केली
पहिली लोक अदालत भगवान श्रीकृष्णाने आयोजित केली होती. कौरव व पांडव यांच्यातील वाद सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. रामधारीसिंह दिनकर यांच्या रचनेचा दाखला देत, भगवान कृष्णाने शांततेच्या मार्गाने समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याचे कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले.
विवाहाशी निगडित वादांवर तोडगा काढण्यासाठी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी न्यायालयाचे कौतुक केले. कधी काळी कुटुंबातील वादावर घरातील वरिष्ठ नागरिक तोडगा काढत होते. आता मात्र वादावर तोडगा काढण्याचे काम व्यवस्थेला करावे लागत आहेत, असे मेघवाल म्हणाले.