रोख रक्कम नसल्यामुळे लोकांनी लुटले स्वस्त धान्य दुकान
By admin | Published: November 13, 2016 03:18 AM2016-11-13T03:18:09+5:302016-11-13T03:18:09+5:30
हजार-पाचशेच्या नोटा चलनातून अचानक बाद करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागांत अनेकांच्या हातात रोजच्या खर्चालाही पैसा नाही. त्यामुळे लोक अतिशय संतापले आहेत.
भोपाळ : हजार-पाचशेच्या नोटा चलनातून अचानक बाद करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागांत अनेकांच्या हातात रोजच्या खर्चालाही पैसा नाही. त्यामुळे लोक अतिशय संतापले आहेत. रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठीही हातात नव्या नोटा नसल्याने आणि जुन्या नोटा स्वीकारायला दुकानदाराने नकार दिल्यामुळे मध्य प्रदेशात लोकांच्या संतापाचा कडेलोटच झाला. त्या लोकांनी स्वस्त धान्याचे दुकान लुटल्याची घटना मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील बारदुआ गावात घडली. दुकानदाराने हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे लोक धान्य लुटून घेऊन गेले.
एका वृत्तवाहिनीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धान्य खरेदीसाठी काही लोक स्वस्त धान्य दुकानात आले होते. त्यांच्याकडे हजार-पाचशेच्या नोटांशिवाय दुसऱ्या नोटा नव्हत्या. या नोटा स्वीकारण्यास दुकानदार मुन्नीलाल अहिरवार यांनी नकार दिला. त्यातून वाद उद्भवला. चिडलेले लोक दुकानात घुसले. त्यांनी गहू, तांदूळ आणि साखरेची पोती लुटून नेली.
या घटनेमागे गावातील सरपंच नन्हेलाल पटेल जबाबदार असल्याचा आरोप दुकानदार अहिरवार याने केला आहे. तर पटेल यांनी म्हटले की, दुकानदार अनेक दिवसांपासून स्वस्त धान्याची अफरातफर करीत होता. त्यामुळे लोक त्याच्यावर आधीच चिडलेले होते. (वृत्तसंस्था)