मित्रों, मोबाईलची कॉन्टॅक्ट लिस्ट लगेच तपासा... आपोआप सेव्ह झालाय 'हा' क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 03:26 PM2018-08-03T15:26:53+5:302018-08-03T15:34:21+5:30
सोशल मीडियावर अनेकांकडून स्क्रिनशॉट शेयर
नवी दिल्ली: देशातील हजारो मोबाईल वापरकर्त्यांना आज धक्का बसला आहे. युनिक आयडेन्टिफिकेशन ऑथॉरटी ऑफ इंडियाचा (यूआयडीएआय) मदत क्रमांक अनेकांच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह झाला आहे. त्यामुळे अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत. याबद्दल आधारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
अनेकांच्या मोबाईलमध्ये आज आधारचा मदतक्रमांक (1800-300-1947) सेव्ह झाला आहे. विशेष म्हणजे मोबाईल वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय हा क्रमांक फोनबुकमध्ये सेव्ह झाला आहे. यावरुन फ्रेंच सुरक्षातज्ञ इलियट अल्डरसन यांनी यूआयडीएआयला ट्विटरवरुन प्रश्न विचारला आहे. 'विविध मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांच्या भारतातील ग्राहकांच्या मोबाईलमध्ये आधार कार्डचा हेल्पलाईन नंबर सेव्ह झाला आहे. ग्राहकांच्या कोणत्याही परवानगीशिवाय हा नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह करण्यात आला आहे. हे का करण्यात आलं आहे, ते समजेल का?', असा प्रश्न अल्डरसन यांनी यूआयडीएआयला विचारला आहे.
काही दिवसांपूर्वीच ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी आधारच्या गोपनीयतेचा संदर्भ देत आपली माहिती हॅक करुन दाखवावी, असं आव्हान दिलं होतं. शर्मा यांनी ट्विटरवरुन आव्हान त्यांचा आधार क्रमांक शेयर करत त्याला लिंक केलेली माहिती जाहीर करण्याचं आव्हान दिलं होतं. यानंतर एका हॅकरनं शर्मा यांचा मोबाईल क्रमांक, घरचा पत्ता, जन्म तारीख, पॅन क्रमांक अशी महत्त्वाची माहिती समोर आणली होती.