लोक दंडाचे पैसेच भरत नाहीत! आता पाच पावत्या झाल्या की तुमचे वाहन...; मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 04:04 PM2023-09-30T16:04:35+5:302023-09-30T16:04:58+5:30
परिवाहन विभाग सध्या अशा ५ हजार वाहनांना नो ट्रान्झेक्शन कॅटेगरीमध्ये टाकत आहे.
वाहतुकीची शिस्त लागावी म्हणून सिग्नल मोडला की, चुकीच्या दिशेने वाहन चालविले की, सीटबेल्ट लावला नाही तर अशा अनेक गोष्टींसाठी वाहतूक खाते दंड आकारते. सध्या सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे पावत्या घरी पाठविल्या जातात. अनेकदा मोबाईलवर मेसेज करून माहिती दिली जाते. परंतू, लोक एवढे निर्ढावलेले असतात पावत्यांवर पावत्या फाटत चालल्या तरी दंड काही भरत नाहीत. यात मोठमोठे राजकीय नेत्यांची देखील भरमार असते.
परंतू, आता दिल्ली पोलिसांनी एक शक्कल लढविली आहे. वाहतूक खात्याने पाच पावत्यांचे लिमिट ठरविले आहे. महिनोंमहिने जे लोक दंडाच्या पावत्या भरत नाहीत त्यांच्यासाठी आता कारवाई सुरु झाली आहे. पाच पेक्षा जास्त पावत्या पेंडिंग राहिल्या की त्याचे वाहन आपोआप नो ट्रान्झेक्शन मोडमध्ये टाकले जाणार आहे. म्हणजे हा व्यक्ती जेव्हा त्याचे वाहन विकायला जाईल किंवा लोन किंवा अन्य काही कामे करण्यासाठी जाईल तेव्हा त्याला तो दंड ऑनलाईन भरता येणार नाहीय.
दिल्ली परिवाहन विभाग सध्या अशा ५ हजार वाहनांना नो ट्रान्झेक्शन कॅटेगरीमध्ये टाकत आहे. याचबरोबर दिल्ली पोलिसांनी अशी चलान भरण्यासाठी ८ ऑक्टोबर २०२३ ला दिल्लीच्या सर्व न्यायालयांत सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत लोक अदालत भरविली जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या पाच हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात आणखी वाहनांवर कारवाई होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. दिल्लीत सध्या 20,684 अशी वाहने आहेत ज्यांनी १०० हून अधिक वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, तसेच दंडही भरलेला नाहीय. अशा लोकांना शेवटची संधी दिली जाणार आहे.
30 जूनपर्यंत वाहतूक पोलिसांनी 58.8 लाख वाहनांना 2.6 कोटी नोटिसा बजावल्या होत्या. 51.2 लाख चालकांनी त्या स्वीकारल्या होत्या. तर २.२ कोटी नोटिसांना काहीच प्रतिसाद मिळालेला नाहीय. प्रलंबित नोटिसांपैकी 67.4 लाख नोटिसा 1.6 लाख वाहनांशी संबंधित आहेत. त्यांच्या विरोधात 20 किंवा त्याहून अधिक नोटीस भरणे बाकी आहे.