अडथळे निर्माण करणाऱ्यांना जनता लक्षात ठेवत नाही, नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 06:30 AM2024-02-01T06:30:47+5:302024-02-01T06:31:10+5:30
Narendra Modi : संसदीय अधिवेशनात गदारोळ माजविण्याची सवय असलेल्या व लोकशाही मूल्ये न पाळणाऱ्यांनी आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यांनी विरोधकांचे नाव न घेता त्यांना हा टोला लगावला.
नवी दिल्ली - संसदीय अधिवेशनात गदारोळ माजविण्याची सवय असलेल्या व लोकशाही मूल्ये न पाळणाऱ्यांनी आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यांनी विरोधकांचे नाव न घेता त्यांना हा टोला लगावला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, संसदेत गदारोळ माजविणाऱ्यांना कोणीही लक्षात ठेवत नाही हे सत्य तशी वर्तणूक असणाऱ्यांनी मतदारसंघात कानोसा घेतला तर त्यांना कळून येईल. मात्र, ज्यांनी आपल्या उत्कृष्ट विचारांनी कामकाजात मोलाची भर घातली आहे, अशा लोकांना समाज नीट लक्षात ठेवतो. अशा खासदारांनी केलेली भाषणे, वक्तव्ये यांना ऐतिहासिक मोल प्राप्त होते.
...तर करणार कारवाई
लोकसभा व राज्यसभेत गदारोळ माजविणाऱ्या १४६ खासदारांना गेल्या संसदीय अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आले होते. ते सर्वजण आता संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात सहभागी होत आहेत. मात्र, त्यांनी सभागृहात फलक आणू नये व कामकाजात अडथळे निर्माण करू नये. मात्र तसे न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मोदींनी दिला.
‘भाजपने लोकशाही धोक्यात आणली’
भाजपने लोकशाही धोक्यात आणली आहे तसेच संसदेचा अपमान केला आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला. १५व्या लोकसभेच्या कामकाजात भाजपनेच सर्वाधिक अडथळे आणले होते हे यासंदर्भातील गेल्या वीस वर्षांच्या कालावधीतील आकडेवारीचा अभ्यास केला असता स्पष्ट होते, असा दावाही खरगे यांनी केला आहे.
महिला शक्तीचे सामर्थ्य...
- गुरुवारी एकप्रकारे महिला शक्तीचा उत्सवच साजरा होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सर्वांनीच महिला सामर्थ्याचा अनुभव घेतला.
- विविध क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढावा म्हणून केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
मोदी म्हणाले...
- नेहमी नकारात्मक विचार मांडणाऱ्या व अडथळे निर्माण करणाऱ्यांना जनता लक्षात ठेवत नाही.
-ही स्थिती पाहता विद्यमान लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनात उत्तम कामगिरी करण्याची संधी खासदारांनी गमावू नये.