अखेर लोकांना मिळाले इंटरनेट, बससेवाही पुन्हा झाली सुरू; नूह जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 08:43 AM2023-08-15T08:43:30+5:302023-08-15T08:44:21+5:30
दोन आठवड्यांपूर्वी जातीय हिंसाचार उसळल्याने मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
गुरुग्राम : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने हरयाणाच्या नूह जिल्ह्यात सोमवारी (दि. १४) मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
दोन आठवड्यांपूर्वी जातीय हिंसाचार उसळल्याने मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. विश्व हिंदू परिषदेच्या मिरवणुकीवर जमावाने हल्ला केल्यानंतर नूहसह आसपासच्या भागात हिंसाचार उसळून गृहरक्षक दलाचे दोन जवान व एका मौलवीसह सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सरकारने ८ ऑगस्टपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली होती. त्यानंतर इंटरनेटवरील बंदी १३ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. हिंसाचारग्रस्त भागात बाजारपेठा उघडल्या असून, लोक नेहमीप्रमाणे तेथे खरेदीला जात आहेत. शाळाही सुरू झाल्या आहेत.
पलवल जिल्ह्यातील पोंद्री गावात हिंदू संघटनांनी आयोजित केलेल्या ‘महापंचायती’ने जातीय हिंसाचाराने विस्कळीत झालेली ब्रज मंडळ यात्रा २८ ऑगस्ट रोजी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ३१ जुलै रोजी नूह येथील विहिंपच्या यात्रेवर झालेल्या हल्ल्याची एनआयए चौकशी करण्यासह अनेक मागण्याही महापंचायतीने केल्या.
स्वातंत्र्य दिन सोहळ्याची तयारी सुरू
नूह येथे स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याची तयारी सुरू आहे. जिल्हास्तरावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी पोलिस संचलन पथकेही तयारीला लागले आहेत. हरयाणा राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्ववत झाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता परिस्थिती अगदी सामान्य आहे, असे उपायुक्त धीरेंद्र खडगटा यांनी सांगितले.