आसामच्या आरोग्य मंत्र्यांनी उधळली मुक्ताफळं, म्हणे पाप केल्याने होतो कर्करोग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 11:05 AM2017-11-23T11:05:03+5:302017-11-23T12:15:13+5:30
आसामचे आरोग्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी कर्करोगाबाबत विधान करून नवा वाद ओढावून घेतला आहे.
गुवाहाटी- आसामचे आरोग्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी कर्करोगाबाबत विधान करून नवा वाद ओढावून घेतला आहे. पूर्वी केलेल्या वाईट कृत्यांमुळेच लोकांना कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. हा एक प्रकारचा दैवी न्यायच असल्याचं विधान आसामचे आरोग्य मंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी केलं आहे. आरोग्य मंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्या या विधानावर राजकीय स्तरातून तसंच कर्करोगग्रस्त रूग्णांकडून टीकेचा भडीमार होतो आहे.
देव आपण केलेल्या पापांची शिक्षा देतो. तरुण मुलाला कर्करोग होतो किंवा त्याचा अपघात होतो. तुम्ही जर याची पार्श्वभूमी बघितली तर त्या व्यक्तींच्या वाईट कृत्यांमुळेच त्यांच्यावर ही वेळ ओढावते. हा दैवी न्याय आहे, असं शर्मा यांनी म्हंटलं. मंगळवारी गुवाहाटीमध्ये शिक्षकांना नेमणूकपत्र वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात हेमंतविश्व शर्मा बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या विधानामुळे उपस्थितांना धक्का बसला.
अनेकदा त्या व्यक्तीची चुकही नसते. त्याच्या आई-वडिलांनी काही पाप केले असतील आणि याची शिक्षा त्या व्यक्तीला होऊ शकते, असंही त्यांनी म्हटलं. गीता, बायबलमध्येही याचा उल्लेख आहे. आपल्याला आपल्या कर्माचंच फळ मिळत असतं. प्रत्येकाला या जन्मातच त्याच्या कर्माची फळं भोगायची आहेत, यापासून कोणाचीही सुटका नाही, असंही आसामचे आरोग्य मंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी म्हंटलं.
हेमंत विश्व शर्मा यांच्या या विधानावर सर्व स्तरातून टीका होते आहे. ‘आरोग्यमंत्र्यांनी कर्करोगाबाबत केलेले विधान निंदनीय आहे. त्यांनी कर्करोग रुग्णांच्या भावना दुखावल्या, त्यांनी या विधानासाठी जाहीर माफी मागितली पाहिजे, असं काँग्रेस नेते देवब्रत सैकिया यांनी म्हंटलं आहे.
आरोग्यमंत्री राज्यात कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले, म्हणून आता ते असं विधान करत आहे, असं ‘एयूडीएफ’ या पक्षाचे नेते अमिनूल इस्लाम म्हणाले आहेत.
आसामचे आरोग्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्या या विधानावर कर्करोग रूग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.