"सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशन आश्रमातून लोक बेपत्ता"; तामिळनाडू पोलिसांची सुप्रीम कोर्टाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:46 AM2024-10-18T11:46:43+5:302024-10-18T11:49:59+5:30

सदगुरू जग्गी वासुदेव संचलित ईशा फाऊंडेशनशी संबंधित असलेल्या प्रकरणात तामिळनाडू पोलिसांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आपला अहवाल दाखल केला.

People have gone missing from inside Sadhguru Jaggi Vasudev ashram TN police tells SC | "सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशन आश्रमातून लोक बेपत्ता"; तामिळनाडू पोलिसांची सुप्रीम कोर्टाला माहिती

"सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशन आश्रमातून लोक बेपत्ता"; तामिळनाडू पोलिसांची सुप्रीम कोर्टाला माहिती

Sadhguru Jaggi Vasudev Isha Foundation : सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.  इशा योगा केंद्राविरोधात निवृत्त प्राध्यापक एस. कामराज यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या दोन मुलींना ईशा फाऊंडेशनमध्ये ब्रेनवॉशिंग करून ठेवण्यात आल्याचा दावा याचिकेमध्ये करण्यात  त्यानंतर देशभरातील इशा योगा केंद्राच्या काही शाखांवर छापेही टाकण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने पोलिसांच्या छाप्यावर स्थगिती दिली आणि याबाबत जाब विचारला होता. आता पोलिसांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या उत्तरात महत्त्वाची माहिती दिली आहे.

निवृत्त प्राध्यापक एस. कामराज यांनी त्यांच्या दोन मुलींना ईशा फाऊंडेशनमध्ये ब्रेनवॉशिंग करून ठेवण्यात आल्याचे म्हटलं होतं. तसेच मुलींना ईशा फाऊंडेशनकडून संसारात न रमता संन्यासी जीवन जगण्यास सांगितले होते. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर न्यायमूर्तींनी स्वतःच्या मुलीचं लग्न लावणारा इतरांच्या मुलींना  इतर तरुणींना संसाराचा त्याग करून संन्याशांसारखं जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन का देत आहेत?, असा सवाल सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या वकिलाला विचारला होता. त्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी ईशा फाऊंडेशनच्या योगा केंद्रामध्ये छापे टाकले होते. त्यानंतर ईशा फाऊंडेशनने सुप्रीम कोर्टातून पोलिसांच्या छाप्यावर स्थगिती आणली होती.

तामिळनाडू पोलिसांनी सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या अहवालात धक्कादायक माहिती दिली आहे. ईशा फाउंडेशनमध्ये गेलेले अनेक लोक बेपत्ता आहेत आणि पोलीस त्यांचा शोध लावू शकले नाहीत, असे तामिळनाडू पोलिसांनी म्हटलं आहे. ईशा फाउंडेशनच्या परिसरात स्मशानभूमी आहे. ईशा फाउंडेशनमधील रुग्णालयातील रुग्णांना तारीख निघून गेलेली औषधे देण्यात येत आहे, असेही तामिळनाडू पोलिसांनी म्हटलं आहे.

 सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी स्थापन केलेल्या ईशा फाऊंडेशनबाबत तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक के कार्तिकेयन यांनी सुप्रीम कोर्टात अहवाल दाखल केला आहे. २३ पानांच्या अहवालानुसार, "जे लोक इशा योगा केंद्रात शिक्षण घेण्यासाठी आले होते ते बेपत्ता झाल्याचे आढळले आणि काही लोकांबाबत तक्रारी आल्या आहेत," असं तामिळनाडू पोलिसांनी सांगितले.

"ईशा फाऊंडेशनच्या संदर्भात १५ वर्षात अलंदुराई पोलिस ठाण्यात एकूण सहा बेपत्ता प्रकरणे नोंदवण्यात आली होती. सहापैकी पाच प्रकरणे बंद करण्यात कारण त्यांची पुढील कार्यवाही बंद करण्यात आली. एका प्रकरणात बेपत्ता व्यक्तीचा अद्याप शोध लागला नसल्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याशिवाय, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७४ अंतर्गत सात गुन्हे दाखल करण्यात आले. सातपैकी दोन प्रकरणांची फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाअभावी चौकशी सुरू आहे," असे पोलिसांनी अहवालात म्हटलं आहे. पोलिसांनी सांगितले की, तिथल्या एका शेजाऱ्याने फाउंडेशनद्वारे बांधली जाणारी स्मशानभूमी काढण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Web Title: People have gone missing from inside Sadhguru Jaggi Vasudev ashram TN police tells SC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.