लिंचिंग घटनांत सहभागी लोक हिंदुत्व विरोधी, भारतीयांचा डीएनए सारखाच - मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:46 AM2021-07-05T09:46:58+5:302021-07-05T09:48:02+5:30
ऐक्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. एकतेचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा गौरव असावा.
गाझियाबाद : सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे, असे प्रतिपादन करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, झुंडीने (लिंचिंग) हल्ला करण्याच्या घटनेत सामील असलेले लोक हिंदुत्वविरोधी आहेत. भारतात इस्लाम धोक्यात आहे, या भीतीयुक्त सापळ्यात मुस्लिस समुदायाने अडकू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रीय मुस्लिम मंचच्या वतीने ‘प्रथम हिंदुस्तानी, हिंदुस्तान प्रथम’ याविषयावर आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. पूजेची पद्धत कशी आहे, या आधारावर लोकांंत फरक केला जाऊ शकत नाही. लिंचिंग घटनेत सामील असलेले लोक हिंदुत्वविरोधी आहे. लोकांविरुद्ध लिंचिंगचे काही खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ते म्हणाले की, मी कोणती प्रतिमा निर्माण करण्यासाठी किंवा मतपेढीच्या राजकारणासाठी या कार्यक्रमात सहभागी झालो नाही. देशाला सशक्त करण्यासाठी आणि समाजातील सर्वांच्या कल्याणसाठी संघ आपले काम करीत राहील.
संवाद हवा...
- ऐक्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. एकतेचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा गौरव असावा. हिंदू-मुस्लिम संघर्षावर एकमेव तोडगा ‘संवाद’ आहे.
- विसंवाद नव्हे. सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे. मग त्यांचा धर्म कोणताही असो. हिंदू-मुस्लिम एकतेची चर्चा दिशाभूल करणारी आहे. कारण ते वेगळे नसून एकच आहेत.
- आपण लोकशाही देशात आहोत. येथे हिंदू किंवा मुस्लिमांचे वर्चस्व असू शकत नाही. येथे केवळ भारतीयांचे वर्चस्व असू शकते.