बापरे! प्रदूषणामुळे उत्तर भारतातील लोकांचं आयुष्य 7 वर्षांनी घटलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 08:57 AM2019-11-01T08:57:47+5:302019-11-01T09:07:57+5:30
वाढत्या प्रदूषणाचा फटका हा गंगा नदीच्या आसपासच्या प्रदेशाला बसला आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतीलप्रदूषणात वाढ झाल्याने हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. दिवाळीत फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली असून श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. असं असतानाच उत्तर भारताला वायू प्रदूषणाने विळखा घातला आहे. वाढत्या प्रदूषणाचा फटका हा गंगा नदीच्या आसपासच्या प्रदेशाला बसला आहे. गंगा नदीच्या आसपास राहणाऱ्या भारतीयांचे आयुष्य सात वर्षांनी घटले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने केलेल्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे.
रिसर्चमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील गंगेच्या पठारावरील प्रदूषण हे उर्वरित देशातील प्रदूषणापेक्षा तिप्पट आहे. 1998 ते 2016 दरम्यान गंगेच्या आसपासच्या परिसरातील वायू प्रदूषणात तब्बल 72 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने या भागातील प्रदूषणाचा अभ्यास केला आहे. यामध्ये गंगा नदीच्या आसपास राहणाऱ्या भारतीयांचे आयुष्य सात वर्षांनी घटले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. गंगा स्वच्छता मोहिम सुरू असतानाच प्रदूषणाची पातळी वाढणं ही चिंतेची बाब आहे.
देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 40 टक्क्यांहून अधिक जनता या परिसरात राहते. यामध्ये बिहार, चंदिगड, दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होतो. 2016 पर्यंत या प्रदेशातील प्रदूषणात 72 टक्के वाढ झाली आणि त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांचे आयुष्य 3.4 ते 7.1 वर्षांनी घटले आहे. मात्र राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत ठरवेले लक्ष्य गाठण्यात भारत यशस्वी झाल्यास तसेच स्थायी स्वरूपात 25 टक्के प्रदूषण कमी करण्यातही यश आल्यास हवेचा दर्जा सुधारेल. याचा परिणाम म्हणून भारतीयांचे सरासरी आयुष्य 1.3 वर्षांनी वाढेल असंही रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत प्रदूषणकारी फटाके वाजवण्यावर बंदी घातली होती व हरित म्हणजे पर्यावरणपूरक फटाके वाजवण्याचा आदेश दिला होता. मात्र तरीही दिल्लीमध्ये प्रदूषण करणारे फटाके हे अनेक ठिकाणी फोडण्यात आले. त्यामुळे हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. वायू गुणवत्ता खराब श्रेणींमध्ये आली असून येत्या काही दिवसांत ती आणखी खालावण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक हा सोमवारी सकाळी (28 ऑक्टोबर) 2.5 चा स्तर 500 (पीएम) राहिला. वायू गुणवत्ता निर्देशांकांमध्ये 300 पेक्षा अधिक परिमाण खूप खराब मानले जाते. मालवीय नगर, लाजपत नगर, कैलाश हिल्स, बुराड़ी, जंगपुरा, शाहदरा, लक्ष्मी नगर, मयूर विहार, सरिता विहार, हरी नगर, न्यू फ्रेंड्स कॉलोनी, द्वारका आणि इतरही काही ठिकाणी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर वायू प्रदूषणात वाढ झालेली दिसून आली आहे.