ईशान्य दिल्लीतील लोकांना आता हवा आहे फक्त आत्मविश्वासच!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 06:17 AM2020-03-01T06:17:28+5:302020-03-01T06:17:51+5:30
विद्यार्थी आपल्या पालकांसह शाळेतील आपल्या नष्ट झालेले वर्ग पाहून रडवेले झाले आहेत.
नवी दिल्ली : ईशान्य दिल्ली दोन दिवसांपासून शांत आहे, पण जळून खाक झालेली घरे, इमारती, कारखाने याबरोबरच उद्ध्वस्त झालेल्या तीन शाळा, इतस्तत: पडलेली पुस्तके आणि वह्या, तुटलेली बाके, त्यामुळे उदास झालेले हजारो विद्यार्थी आणि या हिंसाचारात हरवलेले आपले नातेवाईक शोधण्यात गुंतलेल्यांचे भकास झालेले चेहरे... असे चित्र तिथे आहे. त्या सर्वांना आता हवा आहे आत्मविश्वास, जो तीन दिवसांमध्ये पार नष्ट झाला आहे.
त्या भागांतील तीन शाळा पार उद्ध्वस्त झाल्या आहेत. विद्यार्थी आपल्या पालकांसह शाळेतील आपल्या नष्ट झालेले वर्ग पाहून रडवेले झाले आहेत. ज्या वर्गांत गेल्या शनिवारपर्यंत आपण बसून अभ्यास करीत होतो, तेच नाहीसे झाले आहेत. वर्गातील फळ्यांना खिंडारे पाडण्यात आली आहेत. वह्या-पुस्तकांचा खच वाट्टेल तसा पडला आहे. तुटलेली बाके आणि शिक्षकांच्या खुर्च्या पाहून अनेकांना जीव कासावीस होत आहे.
एकाला अशाच खाली पडलेला वर्गात भारताचा ध्वज सापडला, तेव्हा त्याने तो आपल्या हातात घेतला. तेव्हा सारे काही संपलेले नाही, याची खात्री पटली, पण मी या शाळेत शिकतो, असे म्हणण्याची त्याची हिंमत झाली नाही. तो म्हणाला, ‘मी या शाळेत शिकत होतो.’ शाळा पुन्हा उभी राहील का, याची जणू त्याला खात्रीच नसावी. अर्थात, ७ मार्चपर्यंत तेथील शाळा बंदच राहणार आहेत. सर्व परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत.
मोबाइलवर आपल्या मुलाचा, मुलीचा वा नातेवाइकांचा फोटो दाखवत, यांना तुम्ही पाहिलेत का, असा प्रश्न विचारत फिरणारे अनेक जण तिथे दिसत आहेत. त्यांनी जवळपासच्या सर्व रुग्णालयांत, शवगृहात चकरा मारल्या. दोन्ही ठिकाणी ते सापडले नाहीत. त्यामुळे ते जिवंत असतील, असे अनेकांना वाटत आहे. कुठेतरी नाल्यात, गटारात, ढिगाऱ्याखाली त्यांचे देह सापडू नयेत, अशीच या आत्मविश्वास हरवून बसलेल्या मंडळींची इच्छा आहे.
>त्यांनी एकमेकांना वाचविले
तिथे काहींनी धर्माचा न विचारता करता एकमेकांना वाचविले, धार्मिक स्थळांवर हल्ले होऊ नयेत, यासाठी धर्म न विचारता त्यांनी हल्लेखोरांना एकत्र येऊ न अडविले, तरीही विश्वास डळमळत चालला आहे. पुढील आयुष्य इथे शांततेने काढता येईल का, अशी अनेकांना भीती आहे. त्यांना मदत मिळू लागली आहे आणि हवा आहे केवळ व केवळ आत्मविश्वास! तो जात-धर्म-पंथ न पाहता सर्वांनीच द्यायला हवा.