मोदीजी १५ लाख देत असल्याचा मेसेज आला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 02:33 PM2019-08-01T14:33:18+5:302019-08-01T14:34:39+5:30
पोस्टल खातं असणाऱ्यांना मिळणार १५ लाख रुपये
इडुक्की: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत आले असले तरीही त्यांनी ५ वर्षांपूर्वी दिलेलं १५ लाखांचं आश्वासन आजही अनेकांच्या लक्षात आहे. आजही विरोधक यावरुन मोदींना लक्ष्य करतात. तर भाजपा अध्यक्ष अमित शहांनी काही महिन्यांपूर्वीच १५ लाख म्हणजे केवळ जुमला असल्याचं म्हटलं होतं. मात्र आजही अनेकांना १५ लाख मिळतील, असा विश्वास वाटतो. केरळच्या मुन्नार भागातील पोस्ट कर्मचाऱ्यांना नुकताच याचा अनुभव आला.
मोदीजी १५ लाख देत असल्याचा मेसेज मुन्नारमधील अनेकांना आला. व्हॉट्स अॅपवर आलेला हा मेसेज अनेकांना खरा वाटला. पोस्टल अकाऊंट असणाऱ्यांना मोदी सरकारकडून १५ लाखांपर्यंतचे आर्थिक लाभ मिळणार असल्याचा मेसेज प्रचंड व्हायरल झाला. शनिवारी संध्याकाळी अनेकांना व्हॉट्स अॅपवर मेसेज मिळाल्यानंतर रविवारी मुन्नारच्या पोस्ट ऑफिसबाहेर रांग लागली. हा प्रकार लक्षात येताच पोस्ट कर्मचाऱ्यांनी व्हॉट्स अॅपवर व्हायरल झालेला मेसेज खोटा असल्याचं रांगेतील अनेकांना सांगितलं. पोस्ट ऑफिसच्या आवारात तसे फलकदेखील लावण्यात आले. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही.
१५ लाख मिळणार म्हणून अनेक मजुरांनी सुट्टी घेतली. मिळेल त्या वाहनातून मजूर मोठ्या संख्येनं मुन्नार पोस्ट ऑफिसबाहेरील रांगेत उभे राहिले. पोस्टल खात्यांची संख्या वाढवण्याचे आदेश सरकारनं दिल्यामुळे पोस्ट ऑफिस सुरूच होतं. पोस्ट कर्मचाऱ्यांनी दिवसभर मजुरांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही रात्री ८ पर्यंत पोस्ट ऑफिसबाहेर मजुरांची गर्दी होती. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोस्ट कर्मचाऱ्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. १५ लाखांची अफवा पसरल्यापासून अवघ्या ३ दिवसांमध्ये मुन्नार पोस्ट ऑफिसमध्ये दीड हजार पोस्टल खाती उघडली गेली आहेत.