CoronaVirus News: निवारा छावण्यांतील लोक आता परतू शकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 02:42 AM2020-05-02T02:42:29+5:302020-05-02T02:42:40+5:30
परराज्यात गेली असेल व ती तिथे आपल्या घरात राहात असेल तर अशांना पुन्हा त्यांच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी सरकारने व्यवस्था केलेली नाही, असेही केंद्राने म्हटले आहे.
नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे परराज्यांत अडकून पडल्याने तेथील सरकार, स्वयंसेवी संस्थांनी सुरू केलेल्या निवारा छावण्यांमध्ये राहात असलेल्या सुमारे १४ लाख स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू, पर्यटक आदींनाच घरी पाठविण्यासाठी प्रामुख्याने सध्या व्यवस्था केली जात आहे. त्याचदृष्टीने विविध राज्यांना आदेश देण्यात आल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.
एखाद्या राज्यातील व्यक्ती कामधंद्यानिमित्त परराज्यात गेली असेल व ती तिथे आपल्या घरात राहात असेल तर अशांना पुन्हा त्यांच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी सरकारने व्यवस्था केलेली नाही, असेही केंद्राने म्हटले आहे. तशा आशयाचे पत्रक केंद्रीय गृह खात्याने या आठवड्याच्या प्रारंभी काढले.
लॉकडाऊनमुळे देशातील शिक्षणसंस्था बंद आहेत. असंख्य विद्यार्थी परराज्यांत अडकून पडले आहेत. त्यांना घरी परतण्याची इच्छा आहे. अशा विद्यार्थ्यांपैकी जे हॉस्टेलमध्ये राहात आहेत त्यांची गणना अडकून पडलेल्या लोकांमध्ये करण्यात येणार नाही. पण ज्या विद्यार्थ्यांना लॉकडाऊनच्या काळात खरोखरच राहाण्यापासून अनेक गोष्टींचा सामना करावा लागत
असेल त्यांना घरी परतण्यासाठी सरकारने केलेल्या व्यवस्थेचा लाभ घेता येईल.