लोकांनी न्यायालयाकडे न घाबरता यावे, सरन्यायाधीशांनी केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 06:42 AM2023-11-27T06:42:06+5:302023-11-27T06:43:29+5:30
Chief Justice Of India: सर्वोच्च न्यायालयाने “लोक न्यायालय” म्हणून काम केले आहे आणि नागरिकांनी न्यायालयात जाण्यास घाबरू नये किंवा शेवटचा उपाय म्हणून त्याकडे पाहू नये, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी सांगितले.
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने “लोक न्यायालय” म्हणून काम केले आहे आणि नागरिकांनी न्यायालयात जाण्यास घाबरू नये किंवा शेवटचा उपाय म्हणून त्याकडे पाहू नये, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयातसंविधान दिनाच्या समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी सरन्यायाधीश म्हणाले की, गेल्या सात दशकांमध्ये, हजारो नागरिकांनी या संस्थेच्या माध्यमातून न्याय मिळेल या विश्वासाने काेर्टाच्या दाराशी संपर्क साधला. ही प्रकरणे न्यायालयासाठी केवळ दाखले किंवा आकडेवारी नाहीत, तर न्यायालयाकडून लोकांच्या अपेक्षा तसेच नागरिकांना न्याय देण्याची न्यायालयाची स्वत:ची वचनबद्धता दर्शवतात. प्रत्येक न्यायालयातील प्रत्येक खटला हा घटनात्मक शासनाचा विस्तार आहे.
कायदे सरळ, सोपे करण्याची गरज
- भारतीय संविधान हे देशांतील लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा 'जिवंत दस्तावेज' आहे. जेव्हा आपण देशातील कायदेप्रणालीचा, त्याच्या उद्देशांचा विचार करतो, तेव्हा हे कायदे अधिक सरळ आणि सोपे करण्याची गरज आहे.
- कायद्यांना सध्याच्या युवा पिढीशी अनुकूल करण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी व्यक्त केले.
सरन्यायाधीश म्हणाले...
-सर्वोच्च न्यायालय हे कदाचित जगातील एकमेव न्यायालय आहे जिथे कोणताही नागरिक केवळ सरन्यायाधीशांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक यंत्रणेला गती देऊ शकतो.
-मला आशा आहे की आमच्या प्रयत्नांमुळे प्रत्येक वर्ग, जाती आणि धर्मातील नागरिक आमच्या न्यायालयीन व्यवस्थेवर विश्वास ठेवू शकतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात सध्या भारत मातेचे म्युरल व महात्मा गांधी यांचा पुतळा आहे.