सहा हजार रुपयांचे मोल एसीमध्ये बसणाऱ्यांना कळणार नाही - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 05:43 AM2019-02-04T05:43:38+5:302019-02-04T05:47:22+5:30
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांचे मोल एअरकंडिशण्ड खोल्यांत बसून राजकारण करणाºयांना कधीच कळणार नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना लगावला.
लेह - शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांचे मोल एअरकंडिशण्ड खोल्यांत बसून राजकारण करणाºयांना कधीच कळणार नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना लगावला.
दुष्काळ व अन्य समस्यांनी गांजलेल्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत तीन टप्प्यांत देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील रक्कम लवकरच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांच्या हाती पडेल. तसे निर्देश सर्व राज्य सरकारांना देण्यात आले आहेत, असे सांगून मोदी म्हणाले की, विकासकामात दिरंगाई करण्याचे दिवस आता गेले आहेत. आमचे सरकार अत्यंत कार्यक्षमतेने व ठरलेल्या मुदतीत कामे पूर्ण करत आहे. लेह, लडाखमधील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी पाच नवे गिरीभ्रमंतीचे मार्ग आम्ही खुले केले आहेत.
लेह आणि लडाखमधील विविध नवे प्रकल्प, कुशोक बकुला रिंपोचे विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते रविवारी पार पडला. त्यावेळी ते म्हणाले की, या विविध प्रकल्पांची पायाभरणी मी केली आहे आणि हे त्यांच्या उद्घाटनासाठीही मीच येणार आहे. (वृत्तसंस्था)