वाराणसीची जनता माझी मालक, श्रेष्ठी- पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:45 AM2018-09-19T00:45:56+5:302018-09-19T00:46:12+5:30
मोदी यांनी खासदार या नात्याने त्यांच्या मतदारसंघात केल्या गेलेल्या कामाचा यावेळी तपशील दिला.
वाराणसी : वाराणसीतील जनता ही माझी मालक, श्रेष्ठी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हटले. मोदी यांनी खासदार या नात्याने त्यांच्या मतदारसंघात केल्या गेलेल्या कामाचा यावेळी तपशील दिला.
मोदी यांनी वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात ५५० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले किंवा त्यांची पायाभरणी केली. वाराणसीतील आपला दोन दिवसांचा दौरा आटोपून मोदी म्हणाले की, शहरात केले गेलेले काम स्पष्टपणे दिसते. गेल्या चार वर्षांत शहराचा चेहरा बदलला आहे. यापूर्वीच्या सरकारांच्या कार्यकाळात ही कामे देवाच्या कृपेवर अवलंबून होती, असा टोला त्यांनी लगावला.
वाराणसीचा खासदार या नात्याने माझ्याकडून झालेल्या कामाचा तपशील सादर करणे ही मी माझी जबाबदारी समजतो. पंतप्रधानपदाची जबाबदारी तुम्ही मला दिली; परंतु वाराणसीचा खासदार या नात्याने गेल्या चार वर्षांत मी केलेल्या कामाचा तपशील द्यायलाही मी तेवढाच जबाबदार आहे. वाराणसीचा अनेक वर्षांचा सांस्कृतिक वारसा, परंपरा अबाधित ठेवून त्यात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वीच्या सरकारांच्या वेळी हेच काम ‘भोले के भरोसे’ होते, असे त्यांनी सांगितले.
५५0 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण, पायाभरणी
मोदी यांनी ५५० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे एकतर लोकार्पण केले गेले किंवा त्यांची पायाभरणी केली गेली असे सांगितले. हे विकास प्रकल्प फक्त वाराणसीतीलच आहेत, असे नसून त्याला खेटून असलेल्या भागांसाठीही आहेत. उद््घाटन झालेल्या प्रकल्पांत जुन्या काशीसाठी इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम, बनारस हिंदू विद्यापीठातील अटल इन्क्युबेशन सेंटरचा समावेश आहे. बनारस हिंदू विद्यापीठात रिजनल आॅप्थालमोलोजी सेंटरचा पायाभरणी झाली.