युद्धाची खुमखुमी असलेल्यांनी इतिहास विसरू नये; चीनचा भारताला इशारा
By Admin | Published: June 29, 2017 08:12 PM2017-06-29T20:12:48+5:302017-06-29T20:12:48+5:30
भारत आणि चीन या दोन देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 29 - भारत आणि चीन या दोन देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. भारतीय लष्करानं भारत आणि चीनच्या सीमाभागावर सिक्कीमजवळ चीनला रस्ता बनवण्यास रोखल्यापासून चीन फारच अस्वस्थ झाला आहे. त्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनीही भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
लू कांग म्हणाले, युद्धाची खुमखुमी असलेल्यांनी इतिहास न विसरता त्यापासून धडा घ्यावा. भारतीय लष्करातील व्यक्ती इतिहासापासून नक्कीच काही तरी धडा घेतील आणि युद्धाच्या गर्जना थांबवतील. लू कांग यांनी असा टोला भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांना लगावला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी भारत एकाच वळी पाकिस्तान, चीन आणि अंतर्गत अशा विविध आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज असल्याचे वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरून लू कांग यांनी लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यावर निशाणा साधला आहे. लू कांग यांच्या विधानाचा रोख भारत-चीन यांच्यात 1962मध्ये झालेल्या युद्धाकडे होता. 1962च्या भारत-चीन युद्धात चीननं भारताचा पराभव केला होता.
(मोदी-ट्रम्प जवळीक विध्वंसक सिद्ध होईल, चीनचा तीळपापड)
लष्करप्रमुख बिपीन रावत यांचे विधान अत्यंत बेजबाबदार आणि प्रक्षोभक आहे. आम्हाला आशा आहे की, भारतीय लष्करातील व्यक्ती इतिहासापासून काही तरी धडा घेऊन युद्धाच्या दर्पोक्त्या थांबवतील, असे कांग म्हणाले. दरम्यान, कांग यांनी पत्रकार परिषद घेत भारत जोपर्यंत डोंगलांग परिसरातून सैन्य मागे घेत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये चर्चा होणे अशक्य असल्याचे म्हटले आहे.
तत्पूर्वी सिक्कीमच्या डोक ला भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घुसखोरी करुन भारतीय जवानांना धक्काबुक्की केल्याने दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. भारत नियमबाह्ये कामे करत असून, त्यांना नियम शिकवण्याची गरज असल्याचे ग्लोबल टाइम्स या चीन सरकारच्या वर्तमानपत्राने म्हटले आहे. भारताला अमेरिका आणि अन्य पाश्चात्य देश पाठिंबा देत असल्याने आपण सैनिकीदृष्टया वरचढ असल्याची भारताची भावना आहे. त्यामुळे भारत उद्दामपणा करतोय, असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले होते. भारताचा जीडीपी जगात पाचव्या क्रमांकावर असल्याने देश म्हणून भारताचा आत्मविश्वास सध्या भलताच उंचावला आहे. पण भारत अजून चीनपेक्षा भरपूर मागे आहे हे भारताने लक्षात घ्यावे असे ग्लोबल टाइम्समध्ये छापून आले होते.