उत्तराखंडमध्ये हिमवृष्टीमुळे शेकडो लोक अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:30 AM2018-05-09T01:30:29+5:302018-05-09T01:30:29+5:30
उत्तराखंडमधील केदारनाथ व बद्रिनाथ येथे सातत्याने हिमवृष्टी होत असल्याने माजी मुख्यमंत्री हरिश रावत व काँग्रेस नेते प्रदीप तमता, मनोज रावत यांच्यासह शेकडो जण या तीर्थक्षेत्री अडकून पडले. केदारनाथ येथे महिला भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.
डेहराडून - उत्तराखंडमधील केदारनाथ व बद्रिनाथ येथे सातत्याने हिमवृष्टी होत असल्याने माजी मुख्यमंत्री हरिश रावत व काँग्रेस नेते प्रदीप तमता, मनोज रावत यांच्यासह शेकडो जण या तीर्थक्षेत्री अडकून पडले. केदारनाथ येथे महिला भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.
केदारनाथ येथे अडकलेल्या भाविकांना राज्य आपत्कालीन मदत निधी (एसडीआरएफ)चे जवान व पोलिसांच्या मदतीने कमी उंचीवर असलेल्या गौरीकुंडला आणण्यात येत आहे. काही काँग्रेस नेते केदारनाथच्या दर्शनासाठी पायी जात होते पण तेही अडकून पडले आहेत. बद्रिनाथ येथे जाणाऱ्या भाविकांना हिमवृष्टीमुळे वाटेतच थांबविण्यात आले आहे. डेहराडून येथे सोमवारी रात्री वादळी वारे वाहात होते. हरिद्वार, नैनिताल येथेही वादळी वा-यासह पाऊस पडला.
दरड कोसळून मृत
जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात सोमवारी पावसाने दरड कोसळून नुरीन बेगम ही मुलगी त्यात जिवंत गाडली गेली, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.
मुघल मार्ग वाहतुकीसाठी बंद
जम्मू : जोरदार हिमवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील पूंछ व राजौरी, तसेच शोपियान या जिल्ह्यांना जोडणारा मुघल मार्ग मंगळवारी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हिवाळ्यामध्ये चार महिने बंद राहिल्यानंतर, ३१ मार्चपासून मुघल मार्ग एकदिशा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांतील खराब हवामानामुळे तो पुन्हा बंद करावा लागला.