असंवेदनशीलतेचा कळस! युवकाला जमावाकडून मारहाण सुरु असताना लोक काढत होते 'SELFIE'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 01:31 PM2018-02-23T13:31:10+5:302018-02-23T13:41:56+5:30
मोबाइल कॅमेऱ्यामध्ये सेल्फी कॅमेऱ्याची सुविधा झाल्यापासून सेल्फी कुठे काढावा याचे अनेकांना भान राहिलेले नाही. आपला सेल्फी इतरांपेक्षा भन्नाट असावा या इच्छेपायी सेल्फी फोटो काढताना अनेकांनी आपले प्राण गमवावे आहेत.
पलक्कड - मोबाइल कॅमेऱ्यामध्ये सेल्फी कॅमेऱ्याची सुविधा झाल्यापासून सेल्फी कुठे काढावा याचे अनेकांना भान राहिलेले नाही. आपला सेल्फी इतरांपेक्षा भन्नाट असावा या इच्छेपायी सेल्फी फोटो काढताना अनेकांनी आपले प्राण गमवावे आहेत. पण सेल्फीचा मोह अजिबात कमी झालेला नाही. सेल्फीच्या या मोहापायी समाजाची संवेदनशीलत हरवत चालल्याची अनेक उदहारणे आपल्या आसपास आहेत. केरळच्या अट्टापाडीमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुक्कालीजवळच्या कडुकुमान्ना या आदिवासी पाडयात राहणाऱ्या मधु (27) या युवकाला जमवाकडून मारहाण चालू असताना त्याला वाचवण्याऐवजी काही जण चक्क सेल्फी फोटो काढत होतो. ही गुरुवारची घटना आहे. मधुवर चोरीचा संशय घेऊन स्थानिक त्याला मारहाण करत होते. स्थानिकांनी मधुला पोलिसांच्या ताब्यात सोपवले. पोलिसांच्या गाडीत मधुने उलटी केली. त्यानंतर पोलीस त्याला जवळच्या अगाली आरोग्य केंद्रात घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी मधुला मृत घोषित केले.
Kerala: Man dies after being tied up and thrashed by a mob in Palakkad district, people also took selfies after tying him up. Police register case pic.twitter.com/GGqisFy6Ve
— ANI (@ANI) February 23, 2018
या प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असे मधुच्या आईने सांगितले आहे. मधुला मारहाण केल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देताना त्याची स्थिती अत्यंत वाईट होती असे या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच नेमका मृत्यू कशाने झाला ते स्पष्ट होईल. मधुची मानसिक स्थिती ठिक नव्हती. तो दिवसा जंगलामध्ये भटकंती करायचा. रात्र मुक्कालीला आल्यानंतर त्याने दुकानातून काही वस्तू चोरल्याचा त्याच्यावर आरोप आहे.