Javed Akhtar: 'स्वयंसेवक संघाला पाठिंबा देणारे लोक तालिबानी मानसिकतेचे', गीतकार जावेद अख्तर यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 10:18 AM2021-09-04T10:18:54+5:302021-09-04T10:20:23+5:30
Javed Akhtar: "भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच आहे"
Javed Akhtar: भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच आहे, असं विधान प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी केलं आहे. तालिबानी प्रवृत्ती रानटी असल्याचं सांगत त्यांनी तालिबानवर टीकेची झोड उठवली. याचवेळी भारताचं तालिबान कधी होऊ शकत नाही, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जावेद अख्तर यांनी शुक्रवारी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानच्या प्रश्नावरुन काही महत्त्वाची विधानं केली आहेत. "ज्या पद्धतीनं तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्यासाठी हिंसक प्रयत्न करत आहेत. त्याच पद्धतीनं आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसक आहेत. रानटी आहेत. पण आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत", असं जावेद अख्तर म्हणाले.
भारतातील मुस्लिमांचा एक लहान गट देखील तालिबानचं समर्थन करतोय हे दुर्दैवी असल्याचंही अख्तर म्हणाले आहेत. "तालिबान आणि त्यांच्यासारखं वागण्याची इच्छा ठेवणाऱ्यांमध्ये एक साम्य आहे. देशातील काही मुस्लिमांनीही अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यावर त्याचं स्वागत केलं. हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं. भारतातील मुस्लिम तरुण हे चांगलं जीवन, रोजगार, चांगलं शिक्षण या गोष्टींच्या मागे लागले आहेत. पण मुस्लिमांचा एक गट असा आहे की जो स्त्री-पुरुष असा भेदभाव करतात आणि समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे", असं जावेद अख्तर म्हणाले.
भारताचा तालिबान कधीच होऊ शकत नाही
भारतात कितीही कट्टरतावादी विचारसरणीचे लोक असले तरी भारताचा तालिबान कधीच होऊ शकत नाही असा विश्वासही अख्तर यांनी यावेळी व्यक्त केला. "भारतातील बहुतांश लोकसंख्या ही धर्मनिरपेक्ष विचारांची आहे. ते सभ्य असून एकमेकांचा आदर करतात. त्यामुळे त्यांना तालिबानी विचार आकर्षित करु शकत नाहीत. म्हणूनच भारत आताही आणि भविष्यातही कधीच तालिबानी बनू शकणार नाही", असं जावेद अख्तर म्हणाले.