जनताच या गद्दाराला गाडेल - दिलीप लांडे
By Admin | Published: October 7, 2014 06:40 AM2014-10-07T06:40:33+5:302014-10-07T06:40:59+5:30
विकासकामे, सर्वसामान्य-गोरगरिबांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्याऐवजी कीर्तनात रमलेल्यांना जनताच गाडून टाकेल,
मुंबई : विकासकामे, सर्वसामान्य-गोरगरिबांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्याऐवजी कीर्तनात रमलेल्यांना जनताच गाडून टाकेल, असा विश्वास घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी व्यक्त केला.
काल श्रेयस सिग्लनजवळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेतील भाषणात राज यांनी निवडणुकीच्या तोंडावर मनसेतून भाजपामध्ये उडी घेणाऱ्या राम कदम यांना गद्दार असे संबोधले. तो (राम कदम) आमच्यासाठी मेला, असे सांगत गद्दारांना थारा देऊ नका, असे वक्तव्य केले. कदम विधानसभेत कधी गेलेच नाहीत. त्यांनी आमदार निधीचा वापर मतदारसंघातील गोरगरिबांसाठी करण्याऐवजी फस्त केला. कशाला हवेत असे आमदार, अशी टीका राज यांनी केली.
त्याआधी उमेदवार लांडे यांचे भाषण झाले. त्या वेळी कदम यांनी आमदार म्हणून निवडून येताच पक्ष संघटना खिळखिळी केली. त्यामुळे पक्षाने मला पक्षबांधणीची जबाबदारी दिली. जेव्हा मी या मतदारसंघात फिरलो तेव्हा येथे रस्ते, शौचालयांसह प्रत्येक मूलभूत सुविधांची बोंब आढळली. शौचालयांना साधे दरवाजेही नव्हते. ही अशी गाऱ्हाणी घेऊन येथील जनता मनसेच्या शाखेत येऊ लागली. त्यांच्या अडचणी मी ४८ तासांच्या आत सोडविल्या, असा दावा लांडे यांनी आपल्या भाषणात केला.
या वेळी लांडे यांनी कदमांवर जोरदार टीका केली. या घरेलू कामगार महिलांच्या मुलांना ताज हॉटेलमध्ये जेवू घातल्याचा दावा कदम करतात. प्रत्यक्षात मात्र या मुलांना हॉटेलच्या बेसमेंटमध्ये बसविण्यात आले. घाटकोपरमधल्याच एका चायनिज सेंटरमध्ये बनलेले फ्राइड राइस, सूप कागदी थाळ्यांमध्ये वाढले गेले, असा दावा लांडे यांनी केला. (प्रतिनिधी)