‘त्या’ अधिकारी, व्यायसायिकांवर जनतेचा भारी राग! ५ पैकी ४ भारतीयांचे मत, इप्साेस यूकेचा सर्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 06:12 AM2024-09-07T06:12:03+5:302024-09-07T06:12:10+5:30
India News: निसर्गासह पर्यावरणाचे नुकसान करणारे भारतीय सरकारी अधिकारी तसेच मोठ्या व्यवसायांशी संबंधित लोकांची कृत्ये ही गंभीर गुन्हा असल्याचे घोषित करावे, असे ५ पैकी ४ भारतीयांना वाटते. एका नव्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे.
नवी दिल्ली - निसर्गासह पर्यावरणाचे नुकसान करणारे भारतीय सरकारी अधिकारी तसेच मोठ्या व्यवसायांशी संबंधित लोकांची कृत्ये ही गंभीर गुन्हा असल्याचे घोषित करावे, असे ५ पैकी ४ भारतीयांना वाटते. एका नव्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे. ‘इप्सोस यूके’ने घेतलेल्या आणि ‘अर्थ ४ ऑल’ तसेच ‘ग्लोबल कॉमन अलायन्स’द्वारा कार्यान्वित या सर्व्हेनुसार हवामान बदल आणि पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे ५ पैकी ३ (६१ टक्के) भारतीयांना वाटते. निसर्गाच्या सध्या असलेल्या अवस्थेबद्दल यांतील ९० लोक चिंतित असून, या सर्वेक्षणात सहभागी ७३ टक्के लोकांना हवामान बदलामुळे निसर्गामध्ये होणाऱ्या आकस्मिक बदलांची चिंता वाटते.
यानुसार, पृथ्वीवरील वर्षावन आणि हिमनद्यांसारख्या नैसर्गिक प्रणालींमध्ये झालेले हे बदल निसर्गाच्या संतुलनाला घातक ठरू शकतात. हे बदल पूर्वस्थितीत आणणे अत्यंत कठीण होऊ शकते, असे या लोकांना वाटते. ५७ टक्के लोकांनुसार, हवामान बदलाच्या या समस्येवर तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या जीवनशैलीत फार मोठे बदल न करता उपाय शक्य आहे. तर, ५४ टक्के लोकांच्या मते पर्यावरणासंबंधी धोक्यांबाबत केले जाणारे दावे अतिशयोक्तीपूर्ण आहेत.
असे झाले सर्वेक्षण
या सर्वेक्षणात जी-२०च्या १८ देशांतील नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. या देशांत अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मॅक्सिको, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्रिटन तसेच अमेरिका या देशांचा समावेश आहे. याशिवाय, जी-२० बाहेरचे ऑस्ट्रिया, डेन्मार्क, केनिया आणि स्वीडन या देशांतील नागरिकांची मतेही या सर्व्हेत जाणून घेण्यात आली.
तापमानाने यंदामोडला विक्रम
सन २०२४मध्ये जगभर उष्मा प्रचंड वाढल्याने हे वर्ष विक्रमी तापमान असलेले वर्ष ठरू शकते; कारण, या वर्षी तापमानाचे हे विक्रम मोडले ते गेल्या वर्षीच नोंदले गेले आहेत.
युरोपीय हवामानशास्त्रविषयक संस्था ‘कॉपरनिकस’ने ही माहिती दिली आहे. अभ्यासकांनुसार, यंदा मानवी चुका आणि अल-निनोच्या प्रभावामुळे तापमान उच्च पातळीवर होते.विशेषत: जून महिन्यात जगाच्या बहुतांश भागांत त्या-त्या भागातील हवामानानुसार विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.