लोकांची पहिली पसंती भाजपला; लोकसभा निवडणुकीबाबत PM मोदींचा मोठा दावा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 09:05 PM2023-12-29T21:05:42+5:302023-12-29T21:06:09+5:30
'मी नेहमी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून काम केले.'
नवी दिल्ली: अवघ्या दोन दिवसांत 2023 संपून 2024 सुरू होणार आहे. पुढच्या वर्षी लोकसभानिवडणूक आहे, त्यामुळे सत्ता कुणाच्या हात्त जाणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेला भाजप पुन्हा विजयी होणार की, इंडिया आघाडी मुसंडी मारणार, हे येत्या काही महिन्यात कळेलच. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत एक मोठा दावा केला आहे.
इंडिया टुडे ग्रुपला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'देशातील जनतेने अनेकदा मिश्र सरकारे पाहिली आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांची पहिली निवड भाजप असेल. आज आपल्या देशाला आघाडी सरकारची गरज नाही. यावर देशातील लोक, तज्ज्ञ आणि प्रसारमाध्यमांममध्ये एकमत आहे.'
'मिश्र सरकारांमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे आपण 30 वर्षे गमावली. त्या काळात लोकांनी सुशासनाचा अभाव, तुष्टीकरणाचे राजकारण आणि भ्रष्टाचार पाहिला आहे. यामुळे जगामध्ये भारताची प्रतिमा डागाळली गेली. मी प्रामाणिकपणे आणि वचनबद्धतेने माझे काम करतोय, त्यामुळे साहजिकच लोकांची पसंती भाजपला आहे,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, मी नेहमीच एक गोष्ट पाळली आहे, ती म्हणजे देश प्रथम. मी जे काही केले, ते एक कार्यकर्ता म्हणून केले. मुख्यमंत्री होतो तेव्हाही आणि आताही देशाला आघाडीवर ठेवले आहे. मी जे काही निर्णय घेतले, ते राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून घेतले. लोक मला नेहमी विचारतात की मी कठीण निर्णय कसे घेतो? मला हे अवघड वाटत नाही, कारण मी माझे सर्व निर्णय देशाला अग्रस्थानी ठेवून घेतो.