'परफेक्ट' सेल्फीच्या नादात तरुणी ३०० फुटावरुन पडली समुद्रात
By admin | Published: June 2, 2016 12:13 PM2016-06-02T12:13:53+5:302016-06-02T18:18:31+5:30
आकर्षक सेल्फीच्या मोहापायी स्वत:चा जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - आकर्षक सेल्फीच्या मोहापायी स्वत:चा जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कर्नाटकमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात एका २१ वर्षीय राजस्थानी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रणिता मेहता असे मृत मुलीचे नाव असून, ती कायद्याची विद्यार्थिनी होती.
मित्र-मैत्रिणींसोबत मे महिन्याच्या सुट्टीमध्ये फिरण्यासाठी म्हणून प्रणिता पश्चिम कर्नाटकातील गोकर्ण समुद्र किना-यावर आली होती. २९ मे रोजी प्रणिता आणि तिचे मित्र-मैत्रिणी गोकर्ण येथील दीपगृहामध्ये (लाईटहाऊस) गेले होते. दीपगृहामध्ये प्रणिता हटके सेल्फी काढण्याचा प्रयत्न करताना तिचा पाय घसरला व तीनशे फुटावरुन ती थेट समुद्रात पडली.
प्रणिताच्या मित्र-मैत्रिणींनी स्थानिक मच्छीमारांकडे मदत मागितली पण तो पर्यंत उशीर झाला होता. काहीवेळाने समुद्रातून प्रणिताचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सेल्फीच्या वाढत्या क्रेझमुळे दुर्घटनांमध्येही वाढ होत चालली आहे. काही ठिकाणे नो सेल्फी झोनही घोषित करण्यात आले आहेत. 2015 मध्ये संपूर्ण जगात सेल्फी काढण्याच्या नादात सर्वाधिक 27 मृत्यू भारतात झाले आहेत.