पंजाबमधील हल्ल्यामागे कदाचित लष्करप्रमुख, आप नेत्याचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 01:47 PM2018-11-19T13:47:14+5:302018-11-19T13:48:56+5:30
अमृतसरच्या राजासांसी येथे अज्ञातांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. मात्र, या हल्ल्यावरुन पंजाबच्या राजकीय वर्तुळाच आरोप-
नवी दिल्ली - अमृतसर येथे रविवारी (18 नोव्हेंबर) सकाळी निरंकारी पंथाच्या 'संत समागम' या धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या भाविकांवर बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. मात्र, या हल्ल्यामागे लष्करप्रमुख बिपिन रावत यांचा हात असल्याचा संशय आहे, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे नेते आमदार एच.एस.फुल्का यांनी केला आहे. फुल्का यांच्या या वादग्रस्त विधानाने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका होत आहे.
अमृतसरच्या राजासांसी येथे अज्ञातांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. मात्र, या हल्ल्यावरुन पंजाबच्या राजकीय वर्तुळाच आरोप-प्रत्यारोप घडत आहेत. आपचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते एच.एस. फुल्का यांनी हल्ल्यानंतर लष्करप्रमुख बिपिन रावत यांना लक्ष्य केलं आहे. लष्करप्रमुख बिपिन रावत पंजाबमध्ये आले होते, त्यावेळी राज्यावर दहशतवादी कारवायाचं सावट असल्याचं त्यांनी म्हटले होते. त्यामुळे कदाचित त्यांनीच आपल्या माणसांचा वापर करुन हा हल्ला घडवला असेल, कारण त्यांचे भाकित चुकीचं ठरू नये, असा गंभीर आरोप फुल्का यांनी केला आहे. दरम्यान, फुल्का यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली आहे. माझे वक्तव्य हे काँग्रेसच्या विरोधात होते, लष्करप्रमुखांच्या विरोधात नाही, तरीही मी माफी मागतो, असे रावत यांनी म्हटले आहे.
Amritsar Bomb Blast : हल्लेखोरांची माहिती देणाऱ्याला 50 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा
दरम्यान, हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनआयएची तुकडी या हल्ल्याचा तपास करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे. हा दहशतवादी हल्ला असावा, अशी शक्यता अमृतसरचे पोलीस आयुक्त एस.श्रीवत्स यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यात त्याच ग्रेनेडचा वापर करण्यात आला आहे, जे ग्रेनेड पाकिस्तानी रेंजर्संकडून वापरण्यात येते. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅ.अमरेंद्र सिंग यांनी हल्लेखोरांबाबत माहिती देणाऱ्यांना 50 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.