कायमस्वरूपी ‘वर्क फ्राॅम हाेम’ शक्य, नव्या मार्गदर्शक सूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 01:55 AM2020-11-07T01:55:17+5:302020-11-07T06:52:58+5:30
work from home : तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना याचा जास्त लाभ झाला. या कंपन्यांना दूरसंचार विभागाने दिलासा दिला आहे.
नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या काळात लाखाे लाेकांना ‘वर्क फ्राॅम हाेम’ या संकल्पनेने तारले. आता तंत्र उद्याेगासाठी ही संकल्पना कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. दूरसंचार विभागाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे हे शक्य हाेणार आहे.
‘वर्क फ्राॅम हाेम’ संकल्पनेने अनेक क्षेत्रांना संजीवनी दिली. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना याचा जास्त लाभ झाला. या कंपन्यांना दूरसंचार विभागाने दिलासा दिला आहे. इतर सेवा पुरवठादार कंपन्यांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आवश्यक असलेली नाेंदणी प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
तसेच डाटा संबंधित काम असलेल्या बीपीओ क्षेत्राला ‘ओएसपी’च्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. यासाेबतच बँक गॅरंटी, स्टॅटिक आयपी, नेटवर्क डायग्राम इत्यादींची आता आवश्यकता नाही. तसेच ‘वर्क फ्राॅम हाेम’ आणि ‘वर्क फ्राॅम एनीव्हेअर’ या संकल्पनेमध्ये अडसर ठरणाऱ्या इतर अटीही रद्द करण्यात आल्या आहेत.
काेराेना महामारीच्या काळात ‘वर्क फ्राॅम हाेम’साठी तात्पुरत्या तरतुदी करण्यात आल्या हाेत्या. कायमस्वरूपी अंमलबजावणीसाठी मंत्रिगटाची नेमणूक करण्यात आली हाेती. दूरसंचार, कामगार आणि वाणिज्य मंत्रालयासाेबत समन्वय साधून मंत्रिगटाने या शिफारसी केल्या हाेत्या. सरकारच्या निर्णयाचे नॅसकाॅमसह माहिती तंत्रज्ञान तसेच बीपीओ क्षेत्रातील कंपन्यांनी स्वागत केले आहे. ग्रामीण भागात राेजगार निर्मितीचा फायदा हाेईल, अशी प्रतिक्रिया देण्यात आली.
दाेन्ही कामांची सांगड घालणे महिलांना कठीण
लाॅकडाऊनच्या काळत महिलांवर घरासाेबतच ऑफिसच्या कामाचाही ताण वाढला हाेता. ‘वर्क फ्राॅम
हाेम’मुळे घर आणि ऑफिस या दाेन्ही कामांची सांगड घालणे महिलांना कठीण झाले हाेते. अनलाॅकनंतर राेजगाराची टक्केवारी हळूहळू वाढू लागली. परंतु, त्यात महिलांचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी हाेते. त्यामुळे ‘वर्क फ्राॅम हाेम’ संकल्पनेतही महिलांना नाेकरीची संधी कमीच असल्याची आकडेवारी सांगते.