नवीन बांधकामांसाठी नळजोडण्यांना परवानगी महापालिका : बंदी मागे घेण्याची कार्यवाही सुरू
By admin | Published: August 7, 2016 12:42 AM2016-08-07T00:42:04+5:302016-08-07T00:44:47+5:30
नाशिक : महापालिकेने शहरात सुरू असलेल्या पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर नवीन बांधकामांच्या ठिकाणी नळजोडणी देण्यास बंदी घातली होती. आता शहरात समाधानकारक पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने महापालिकेने सदर बंदी मागे घेण्याची कार्यवाही सुरू केली असून, लवकरच निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.
नाशिक : महापालिकेने शहरात सुरू असलेल्या पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर नवीन बांधकामांच्या ठिकाणी नळजोडणी देण्यास बंदी घातली होती. आता शहरात समाधानकारक पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने महापालिकेने सदर बंदी मागे घेण्याची कार्यवाही सुरू केली असून, लवकरच निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.
गंगापूर धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे महापालिकेने दि. ९ ऑक्टोबर २०१५ पासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी पाण्याची बचत करण्यासाठी शहरातील बांधकामांच्या ठिकाणी देण्यात आलेल्या नळजोडण्या बंद करण्यात आल्या होत्या शिवाय नवीन बांधकामांना नळजोडण्या देण्यास मनाई केली होती. नवीन बांधकामांच्या ठिकाणी बव्हंशी व्यावसायिकांकडून विंधणविहिरींचे पाणी वापरले जात असल्याने त्यांच्यावर फारसा परिणाम जाणवला नाही, परंतु ज्याठिकाणी असलेल्या नळजोडण्या बंद करण्यात आल्याने काही इमारतींमध्ये वास्तव्यास आलेल्या रहिवाशांची मात्र गैरसोय झाली. दरम्यान, गेल्या तीन आठवड्यांपासून शहरात समाधानकारक पाऊस झाल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने महापौरांनी आठवड्यातील दर गुरुवारची पाणीकपातही रद्द केली आहे, तर बंद केलेले तरणतलावही खुले केले आहेत. आता नवीन बांधकामांसाठी पुन्हा नळजोडण्यांकरिता परवानगी देण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने अतिरिक्त आयुक्तांपुढे ठेवला असून, लवकरच त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन बांधकामांना नळजोडण्या मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पूर्ण झालेल्या बांधकामांना मिळणार दिलासा
शहरात सद्यस्थितीत राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयामुळे असंख्य बांधकामांना परवानगी मिळविणे अवघड होऊन बसले आहे. पाणीकपातीमुळे बांधकामांना नळजोडण्याही देणे थांबविले गेले होते. मात्र, ज्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहेत, परंतु त्यांना अद्याप पूर्णत्वाचा दाखला प्राप्त होऊ शकलेला नाही. त्यांना आता नळजोडणीसाठी बांधकामाच्या दरात परवानगी मिळविणे शक्य होणार आहे.