‘एटीएस’कडून छळ; प्रज्ञासिंह यांचा आरोप
By admin | Published: April 28, 2017 01:48 AM2017-04-28T01:48:47+5:302017-04-28T01:48:47+5:30
भगवा दहशतवादाचा बागुलबुवा करून केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने रचलेल्या कटकारस्थानात मला गोवण्यात आले.
भोपाळ : भगवा दहशतवादाचा बागुलबुवा करून केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने रचलेल्या कटकारस्थानात मला गोवण्यात आले. दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या छळामुळे मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचली होती; परंतु अंतरात्मा सहीसलामत होता, असे सांगत प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेस आणि एटीएसवर गंभीर आरोप केले.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दोन दिवसांपूर्वी जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर त्या पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी बोलल्या. काँग्रेस आणि एटीएसवर त्यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, भगवा दहशतवाद या शब्दाचे जनक पी. चिदंबरम आहेत. कटकारस्थान रचून मला भगव्या दहशतवादाखाली अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. २० आॅक्टोबर २०१० रोजी एटीएसने (सुरत) जेव्हा मला बेकायशीररीत्या ताब्यात घेतले तेव्हा मी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होती. एटीएसने केलेल्या छळाला इतिहासात तोड नाही, असा गंभीर आरोप करीत त्यांनी एटीएसचे हेमंत करकरे, खानविलकर यांची नावे घेतली. पाच दिवस मी व्हेन्टिलेटरवर होती. आज मला इतरांवर विसंबून राहावे लागते.
माजी गृहमंत्री चिदंबरम यांनी ‘भगवा दहशतवाद’ या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला. तथापि, असा कोणताही प्रकार नाही. नऊ वर्षे मी तुरुंगात काढली. माझी पूर्वीच सुटका व्हायला हवी होती.
अखेर माझी सुटका करण्यात आली आहे. तथापि, मला पुढेही उपचार घ्यावे लागणार आहेत, असे त्यांनी सांगितले. तुरुंगातून सुटका झाल्याने मला थोडासा दिलासा जरूर मिळाला आहे, असे सांगत त्यांनी कोर्टाचे आभार मानले. पत्रकार परिषदेची सुरुवात त्यांनी ‘भारत माता की जय’ अशा जयघोषाने केली.