दिव्यांगांसह, सर्वांना एकत्र आणणारे लोकमत व त्रिनयनी प्रस्तुत राष्ट्रगीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 03:23 PM2017-08-14T15:23:06+5:302017-08-15T07:00:00+5:30
भारताच्या 71व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्र व गोव्यातील पहिल्या क्रमांकाचं दैनिक लोकमत आणि ना नफा तत्वावरील एनजीओ त्रिनयनी आणत आहेत एक ...
भारताच्या 71व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्र व गोव्यातील पहिल्या क्रमांकाचं दैनिक लोकमत आणि ना नफा तत्वावरील एनजीओ त्रिनयनी आणत आहेत एक फिल्म जिच्यामध्ये सामान्यांबरोबरच दिव्यांगांनाही एकत्र आणण्यात आलं आहे. विशेष गुण असलेल्या व चमकदार कामगिरी केलेल्या दिव्यांगांच्या प्रती लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी असा प्रयत्न लोकमतने या कलाकृतीच्या माध्यमातून केला आहे. या फिल्मचा गाभा सर्वसमावेशक भारत असा असून दिव्यांगांच्या बरोबरच सर्वसाधारण लोकांनी एकत्रितरीत्या राष्ट्रगीत गायले आहे.
दृष्टीहीन, मूकबधीर, गतीमंद आदी व्यंग असलेल्यांबरोबरच समलैंगिकांच्या प्रतिनिधींचा तसेच अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांचा सहभाग या फिल्ममध्ये करण्यात आला आहे. लोकमतच्या पुढाकाराने बनवण्यात आलेल्या या फिल्मला रितिका साहनी (गायिका, सामाजिक कार्यकर्ती, संस्थापक व विश्वस्त सदस्य - त्रिनयनी एनजीओ) यांनी मूर्त स्वरूप दिले आहे आणि टीम त्रिनयनीने हातभार लावला आहे. सर्वसमावेश भारत, एकत्र भारत या उपक्रमाची गरज असल्याचा प्रयत्न या फिल्मच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
गायिका, सामाजिक कार्यकर्ती व त्रिनयनीची संस्थापक असलेल्या रितिका साहनी यांची ओळख सर्वसमावेशक व समानतेला प्राधान्य देणारा समाज निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम घेणारी व्यक्ती अशी आहे. त्यांच्या ध्येयानुरुप कार्यासाठी लोकमत वृत्त समूहानं साहनी यांनी आमंत्रित केले आणि या फिल्मची निर्मिती केली. विविध समस्यांचा सामना करत असलेल्या दिव्यांगांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आणि राष्ट्रगीतीचे रेकॉर्डिंग व शुटिंग करण्यात आले.
{{{{dailymotion_video_id####x8459zk}}}}
एका शाळेच्या प्रांगणात हे शुटिंग करण्यात आले असून यामध्ये एकूण 30 जणांचा सहभाग आहे, ज्यामध्ये 17 दिव्यांग मित्रमंडळी आहेत. वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या व क्षमतांच्या लोकांना एकाच छत्राखाली आणण्यात आले असून यामध्ये व्हीलचेअरचा वापर करणाऱ्या, चिन्हांची भाषा वापरणाऱ्यांचा, अपंगांचा, अॅसिड अॅटॅकमधून वाचलेल्यांचा, समलैंगिक समाजाचे प्रतिनिधी असलेल्यांचा समावेश आहे. हा व्हिडीओ सर्वसमावेशक करण्यासाठी सर्वसामान्य किंवा सुदृढांचाही समावेश करण्यात आला आहे. विविधतेचा संपूर्ण अर्क या फिल्ममध्ये उतरला असून त्यातून एकत्रितता ही दिसून येते. त्रिनयनीला कुठल्या प्रकारचा समाज अपेक्षित आहे हे ही त्यातून ध्वनीत होते. या फिल्मच्या निर्मितीत सहभागी असलेल्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडणाऱ्या आनंदातून हे स्पष्ट होत होते की या उपक्रमामुळे किती आनंदी वातावरणनिर्मिती झाली आहे.
लोकमत व त्रिनयनीचं पाठबळ व मार्गदर्शन आणि सगळ्या सहभागींच्या सहयोगाखेरीज हे शक्य झालं नसतं. या फिल्ममध्ये स्नेहा जावळे (अॅसिड हल्ल्यातील पिडीत व करमवीर चक्रविजेती), राहूल रामुगडे (पॅरा स्विमर, महाराष्ट्र व व्हीलचेअर बास्केटबॉल प्लेअर व राज्यपातळीवरील सुवर्णपदक विजेता स्विमर), नीनू केवलानी (मिस व्हीलचेअर इंडिया), रमेश मिश्रा (राज्य पातळीवरील पॅरा ऑलिंपिक चँपियन) यासह अन्यांचा सहभाग आहे.