विकृत ! हॉस्पिटलने महिला रुग्णाला जमिनीवरच वाढलं जेवण
By admin | Published: September 24, 2016 03:41 PM2016-09-24T15:41:16+5:302016-09-24T15:41:16+5:30
रांचीमधील राजेंद्र इन्सिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात ही विकृत आणि धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
झारखंड, दि. 24 - सरकारी रुग्णालयांमधील असुविधा हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. वॉर्डमधील रुग्णांना अक्षरक्ष: गुरांसारखं कोंबून करण्यात आलेली गर्दी, तुटलेले बेड, अस्वच्छ बाथरुम याची आता लोकांनाही सवय झाली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये काय परिस्थिती आहे याची आपल्याला पुर्ण कल्पना आहे असं वाटत असतानाच नवीन काहीतरी घडतं, ज्यामुळे परिस्थिती अजून बिकट होत चालली असल्याचं दिसतं. झारखंडमधील एका रुग्णालयात महिला रुग्णाला चक्क जमिनीवर जेवायला वाढल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
रांचीमधील राजेंद्र इन्सिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात ही विकृत आणि धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे रुग्णालय कोणत्या दुर्गम भागात नसून शहरात आहे. सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांमध्ये याचा समावेश आहे.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार पालमती देवी यांचा हात मोडला होता त्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पालमती देवी जेवण्यासाठी गेल्या असता त्यांच्याकडे प्लेट नसल्याने स्वयंपाकघरातील कर्मचा-यांनी त्यांना जमिनीवरच जेवण वाढलं. पालमती देवी यांनी विनंती करुनही त्यांना कर्मचा-यांनी प्लेट नाही दिली.
कर्मचा-यांचा विकृतपणा इतकाच नव्हता तर जेवण वाढण्याआधी त्यांनी पालमती देवी यांना जमीन स्वच्छ करण्यासही सांगितलं. पालमती देवी यांनी जमिनीवरच डाळ, भात वाढण्यात आला. रुग्णालयाचे संचालक बी एस शेरवाल यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असल्याचं सांगितलं आहे.