परवेझ मुशर्रफ यांच्या कुटुंबाची भारतातील संपत्ती विक्रीला; शत्रू संपत्ती नोंद, पहा किती आहे किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 06:19 PM2024-08-31T18:19:53+5:302024-08-31T18:20:16+5:30
मुशर्रफ यांच्या कुटुंबाची उत्तर प्रदेशमध्ये जमीन आहे. फाळणीवेळी त्यांचे कुटुंबीय ही संपत्ती सोडून पाकिस्तानला गेले होते.
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती, माजी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या कुटुंबाची भारतातील जमीन भारत सरकारने विक्रीला काढली आहे. भारत-पाकिस्तानमधील चर्चेचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी सुरु राहणार नाही असे अनेकदा भारताने सुनावलेले आहे. असे असताना भारताने मुशर्रफ यांची वारसाहक्काने चालत आलेली जमीन भारताने विकायला काढली आहे.
मुशर्रफ यांच्या कुटुंबाची उत्तर प्रदेशमध्ये जमीन आहे. फाळणीवेळी त्यांचे कुटुंबीय ही संपत्ती सोडून पाकिस्तानला गेले होते. ही संपत्ती आता शत्रू संपत्ती म्हणून भारताच्या ताब्यात असून तिचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे.
परवेझ मुशर्रफ यांच्या भावाची आणि त्याच्या कुटुंबाची बागपत जिल्ह्याच्या कोतानामध्ये मालमत्ता आहे. पाच सप्टेंबरपर्यंत यातील निम्मी जमीन विकली जाणार आहे. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या संपत्तीच्या रेकॉर्डवर नवीन नाव टाकले जाणार आहे. मुशर्रफ यांचे वडील मुशर्रफुद्दीन आणि आई जरीन या कोतानाच्या गावात राहत होत्या. लग्नानंतर ते १९४३ ला दिल्लीला गेले. दिल्लीमध्ये परवेझ आणि जावेद यांचा जन्म झाला. १९४७ मध्ये मुशर्रफ यांचे कुटुंबीय पाकिस्तानात गेले. कोतानाशिवाय दिल्लीतही मुशर्रफ यांची संपत्ती आहे.
भारत सरकारने शत्रू संपत्ती म्हणून परवेझ मुशर्रफ यांच्या वाट्याची जमीन आधीच विकली आहे. आता जावेदची २ एकर जमीन आणि हवेली उरली आहे. तसेच कोतानाची हवेली परवेझ यांच्या चुलत भावाच्या नावावर आहे. १५ वर्षांपूर्वी ही संपत्ती शत्रू संपत्ती म्हणून नोंद करण्यात आली होती. या संपत्तीची किंमत 37.5 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. ऑनलाईन या संपत्तीचा लिलाव केला जाणार आहे.