पीटर मुखर्जीची घेतली ‘लाय डिटेक्टर टेस्ट’

By admin | Published: November 29, 2015 03:36 AM2015-11-29T03:36:42+5:302015-11-29T03:36:42+5:30

मुंबईतील बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेला माजी माध्यम सम्राट पीटर मुखर्जी याने दिलेल्या जबानीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी केंद्रीय

Peter Mukherjee's 'Lie Detector Test' | पीटर मुखर्जीची घेतली ‘लाय डिटेक्टर टेस्ट’

पीटर मुखर्जीची घेतली ‘लाय डिटेक्टर टेस्ट’

Next

नवी दिल्ली: मुंबईतील बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेला माजी माध्यम सम्राट पीटर मुखर्जी याने दिलेल्या जबानीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) शनिवारी मुखर्जींची ‘लाय डिटेक्टर टेस्ट’( पॉलीग्राफ चाचणी) करण्यात आली. मृत शीना ही मुखर्जीची सावत्र मुलगी होती.
जबानीत दिलेल्या काही उत्तरांवरून मुखर्जी खोटे बोलत असल्याचे संकेत मिळाले आहेत. परंतु चाचणीचा अहवाल अद्याप तपास संस्थेला मिळाला नसल्याने तूर्तास कुठलाही निष्कर्ष काढता येणार नाही,असे सीबीआय सूत्रांनी सांगितले. मुखर्जीच्या लाय डिटेक्टर चाचणीसाठी शुक्रवारी विशेष न्यायालयाची परवानगी घेण्यात आली होती.
चाचणीदरम्यान पीटरला गुन्ह्यासोबतच पत्नी इंद्राणीसोबत झालेला वार्तालाप आणि त्याने पोलिसांना दिलेल्या जबानीबद्दल असंख्य प्रश्न विचारण्यात आले. त्याला विचारावयाच्या प्रश्नांची यादी चाचणी घेणाऱ्या सीएफएसएल तज्ज्ञांना सोपविण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)

एफआयआर नोंदवलाच नाही
शीना बोरा हिचा मृतदेह २०१२ मध्ये आढळल्याचे माहिती असूनही रायगडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे यांनी आपल्याला प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवून न घेण्यास सांगितले होते, अशी पोलीस निरीक्षक सुरेश मिरघे यांनी केंद्रीय गुप्तचर खात्याकडे (सीबीआय) दिलेल्या आपल्या निवेदनात दिली आहे. - वृत्त/६

कशी घेतात चाचणी?
लाय डिटेक्टर चाचणी एखाद्या व्यक्तीला गुन्ह्याशी संबंधित प्रश्न विचारल्यानंतर त्याच्या शरीरात होणाऱ्या बदलाच्या सिद्धांतावर आधारित आहे. अटक आणि गुन्हयात अडकण्याच्या भीतीपोटी संबंधित व्यक्ती सत्य लपवून ठेवण्याचा प्रयत्न करते. यामुळे शरीरात अनियंत्रित मनोवैज्ञानिक प्रतिक्रिया उमटतात. त्याचे मोजमाप पॉलीग्राफ नामक उपकरणाद्वारे केले जाते,अशी माहिती सीबीआयने दिली.

मुखर्जीने या हत्याकांडाच्या मुख्य पैलूंबाबत आपली जबानी अनेकदा बदलली होती आणि त्याने दिलेली उत्तरेही विश्वासार्ह वाटत नसल्याने ही चाचणी आवश्यक होती, असा दावा सूत्रांनी केला. मुखर्जीला चौकशीसाठी सकाळी येथील केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत नेण्यात आले. यावेळी कक्षात केवळ शास्त्रज्ञ आणि मुखर्जीच हजर होते.

Web Title: Peter Mukherjee's 'Lie Detector Test'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.