सीतेचा त्याग केला म्हणून भगवान रामाविरुद्ध याचिका
By admin | Published: February 1, 2016 02:08 AM2016-02-01T02:08:26+5:302016-02-01T11:18:19+5:30
एका धोब्याच्या म्हणण्यावरून सीतेचा त्याग करणाऱ्याा भगवान श्रीरामचंद्रांविरुद्ध बिहारच्या सीतामढी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
एस.पी. सिन्हा, पाटणा
एका धोब्याच्या म्हणण्यावरून सीतेचा त्याग करणाऱ्याा भगवान श्रीरामचंद्रांविरुद्ध बिहारच्या सीतामढी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या सोमवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या आधारावर भगवान श्रीरामचंद्रांविरुद्ध खटला दाखल करता येईल का, याचा निर्णय न्यायालय यावेळी घेईल.
सीतामढीच्या डुमरी कला गावातील रहिवासी असलेले ठाकूर चंदन सिंह यांनी शनिवारी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात ही याचिका दाखल केली. एका धोब्याच्या सांगण्यावरून भगवान रामचद्रांनी सीतेचा त्याग केला.
लक्ष्मणानेही याकामी भगवान रामचंद्रांची साथ दिली. सीतेची कुठलीही चूक नव्हती. कुठलाही पुरुष पत्नीवर इतका मोठा अन्याय कसा करू शकतो? जी पत्नी आपन्या पतीसोबत एकनिष्ठ राहून त्याच्या सुख-दु:खात सोबत देते, तिला इतकी मोठी शिक्षा का? असे अनेक प्रश्न ठाकूर चंदन सिंह यांनी आपल्या याचिकेत उपस्थित केले आहेत.
या पार्श्वभूमीवर ठाकूर चंदन सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे. आपल्या याचिकेचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे हा नसून सीतेला न्याय मिळवून देणे हा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. स्त्रियांवरील अन्याय त्रेता युगापासून सुरू झाला.
त्रेता युगातील स्त्रीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत कलियुगातील महिलांनाही न्याय मिळणार नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला आहे.
भगवान रामचंद्र यांच्या विवेकावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. भगवान रामचंद्र यांची विवेकबुद्धी योग्य होती का? यावर चर्चा व्हायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.सीतेच्या विवाहासाठी रचलेल्या स्वयंवरात भगवान रामचंद्रांनी शिवजीचे धनुष्य तोडले आणि सीतेशी विवाह केला. यानंतर ते पिता दशरथ यांच्या इच्छेखातर १४ वर्षांच्या वनवासात निघून गेले.
यावेळी सीतेनेही पत्नीधर्माचे पालन करीत त्यांच्या सोबत वनवासात जाण्याच्या निर्णय घेतला. १४ वर्षांच्या वनवासानंतर श्रीरामचंद्र यांचा राज्याभिषेक झाला. त्यांच्याच नगरीत एक धोबी राहत असतो.
पत्नी परपुरुषासोबत राहिल्यानंतरही तिचा स्वीकार रामाने केला; पण मी तसे करणार नाही, असे एक धोबी त्याच्या पत्नीला म्हणाला आणि गुप्तहेरांमार्फत भगवान रामचंद्र यांच्या कानावर पडले आणि यानंतर रामाने सीतेचा त्याग केला, अशी कथा आहे.