रंजन गोगोई यांच्याविरुद्धची याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 06:27 AM2020-08-22T06:27:43+5:302020-08-22T06:27:55+5:30
याचिकाकर्त्याने न्या. गोगोई यांनी दिलेल्या काही कथित ‘चुकीच्या व पक्षपाती’ निकालांचा हवाला दिला होता.
नवी दिल्ली : ‘ते आता निवृत्त झाले असल्याने आम्ही काही करू शकत नाही’, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने माजी सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्याविरुद्ध करण्यात आलेली एक याचिका शुक्रवारी फेटाळली.
रामबाग, पौड रोड, कोथरूड, पुणे येथील अरुण रामचंद्र हुबळीकर यांनी ही याचिका केली होती व न्यायालयाने न्या. गोगोई यांच्याविरुद्ध पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल ‘इनहाऊस’ चौकशी करावी, अशी त्यांची विनंती होती. त्यासाठी याचिकाकर्त्याने न्या. गोगोई यांनी दिलेल्या काही कथित ‘चुकीच्या व पक्षपाती’ निकालांचा हवाला दिला होता.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्या. गोगोई निवृत्त होण्याआधीच म्हणजे सन २०१८ मध्येच ही याचिका केली गेली होती व ती शुक्रवारी प्रथमच न्या. अरुण मिश्रा, न्या. भूषण गवई व न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आली.