कुलभूषणच्या सुटकेसाठी आईची पाककडे याचिका
By admin | Published: April 27, 2017 01:10 AM2017-04-27T01:10:15+5:302017-04-27T01:10:15+5:30
लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आईची याचिका
नवी दिल्ली : लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आईची याचिका (अपील) भारताने बुधवारी पाकिस्तानकडे सोपवून त्यांची शिक्षा रोखण्याची प्रक्रिया सुरू केली.
कूलभूषण यांच्या आई अवंती सुधीर जाधव यांची ही याचिका भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावाले यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव तहमीना जंजुआ यांना सोपविली. ही याचिका अपिलीय न्यायालयाला देण्यासाठी पाककडे देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
बंबावाले यांनी कूलभूषण यांच्या आईचे एक विनंती पत्रही जंजुआ यांना दिले. या पत्रात कूलभूषण यांच्या आईने त्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तान सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यासह मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार, मृत्युदंड ठोठावण्यात आलेल्या व्यक्तीने निर्णय सुनावण्यात आल्यानंतर ४० दिवसांच्या आत अपिलीय न्यायालयाकडे अपील करावे लागते. जाधव यांच्या प्रकरणी बंबावाले यांनी जंजुआ यांची भेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे.