नुपूर शर्मांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; सर्व FIR दिल्लीला ट्रान्सफर करण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 05:34 PM2022-08-10T17:34:31+5:302022-08-10T17:35:15+5:30
Nupur Sharma : नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेट शोमध्ये प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध दाखल सर्व एफआयआर दिल्लीत ट्रान्सफर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध देशभरात नोंदवलेले खटले सुप्रीम कोर्टाने तपास यंत्रणेकडे सोपवले. सर्व प्रकरणांची दिल्लीत चौकशी केली जाईल. जीवाला धोका असल्याने सर्व एफआयआर दिल्लीला ट्रान्सफर करण्यात आले.
नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या सर्व एफआयआरमध्ये दिल्लीतील घडामोडींचा मोठा भाग आहे. भविष्यात एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्याचा अधिकार त्यांनी गमावला आहे, ज्यासाठी त्या दिल्ली हायकोर्टात देखील जाऊ शकतात, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तसेच, दिल्ली पोलिसांनी 8 जून 2022 रोजी एफआयआर नोंदवला होता. याचिकाकर्त्याच्या जीवाला आणि स्वातंत्र्याला असलेल्या गंभीर धोक्याची कोर्टाने आधीच दखल घेतली आहे, त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
SC clubs & transfers all FIRs against Nupur Sharma over alleged hate statement on Prophet Mohammad, to Delhi
— ANI (@ANI) August 10, 2022
(File Pic) pic.twitter.com/F8bnEzdYBy
दरम्यान, भाजपच्या प्रवक्त्या असलेल्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेट शोमध्ये प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात त्यांच्याविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला होता. यानंतर भाजपने त्यांना निलंबित केले. त्यांच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. कोलकाता पोलिसांनी त्यांना अनेकदा समन्स बजावले आहे. त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती .