बँकांची सर्वोच्च न्यायालयात याचिका, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना
By Admin | Published: March 9, 2016 08:39 AM2016-03-09T08:39:36+5:302016-03-09T15:17:45+5:30
उद्योगपती विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ९ - उद्योगपती विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. मात्र बँकांनी याचिका करण्यास उशीर केला आहे कारण विजय मल्ल्या काही दिवसांपूर्वीच देश सोडून गेले आहेत.
१७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका केली आहे. न्यायालयानेदेखील बुधवारी या याचिकेवर सुनावणीला सहमती दर्शविली आहे. मात्र विजय मल्ल्या देश सोडून गेल्याची कल्पनाच बँकांना नाही आहे. विजय मल्ल्या यांच्या प्रवक्त्याने मलाही ते कुठे आहेत याची माहिती नाही, मी फक्त मेलद्वारे त्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं आहे.
सार्वजनिक बँकांच्यावतीने अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी याचिका सादर करताना तातडीने सुनावणीची विनंती केली होती. मल्ल्यांच्या विविध कंपन्यांनी कर्ज उचलले असल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियासह १७ सार्वजनिक बँकांनी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. ही थकित रक्कम हजारो कोटी रुपयांच्या घरात असल्याचे रोहतगी यांनी सांगितले आहे. दियाजियोकडून ५१५ कोटींची डील झाल्यानंतर विजय माल्या यांनी लंडनमध्ये स्थायिक होण्याचे संकेत दिल्याने बँकांनी ही याचिका केली होती. या याचिकेत विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट जप्त करण्याची तसंच त्यांची संपत्ती जाहीर करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्या यांना नोटीस बजावली असून येत्या दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. लंडनमधील भारतीय दूतावासाकडून मल्ल्या यांना त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर नोटीस बाजवण्यात येणार आहे.