विदर्भात लवकरच पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स - धर्मेंद्र प्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 08:39 AM2021-06-30T08:39:11+5:302021-06-30T08:39:57+5:30
धर्मेंद्र प्रधान : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शिष्टमंडळासह भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : विदर्भात जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व्हावे यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद)च्या शिष्टमंडळासोबत मंगळवारी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. प्रधान यांनी यासंदर्भात तांत्रिक व्यवहार्यता (टेक्नोफिझिबिलिटी) अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विदर्भात जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स स्थापन करण्यासंदर्भातील विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (वेद) प्रस्तावावर फडणवीस आणि प्रधान यांची चर्चा झाली. या शिष्टमंडळात खासदार अशोक नेते आणि वेदचे पदाधिकारी प्रदीप माहेश्वरी, विनायक मराठे, शिवकुमार राव, नवीन मालेवार यांचा समावेश होता.
शिष्टमंडळातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रधान हे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सबाबत सकारात्मक आहेत. ही बैठक या महत्त्वाच्या प्रकल्पाची सुरुवात असल्याचा आशावाद शिष्टमंडळाने व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यात हा प्रकल्प व्हावा यासाठी आग्रह असणार आहे.
ही चर्चा अतिशय सकारात्मक झाली, याचा मला आनंद आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ या प्रकल्पासाठी टेक्नोफिझिबिलिटी अहवाल तयार करण्यासंदर्भातील निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी मी त्यांचा अतिशय आभारी आहे. या प्रकल्पामुळे विदर्भात अनेक नवे उद्योग येतील, गुंतवणूक आणि रोजगार वाढण्यासाठीसुद्धा त्यामुळे मोठी मदत होणार आहे.
- देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री