मुंबईत पेट्रोल 108 तर भोपाळमध्ये 110 रुपये लिटर, इंधन दरवाढ थांबता थांबेना...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 08:47 AM2021-07-15T08:47:15+5:302021-07-15T08:48:42+5:30
मुंबईमध्ये पेट्रोल पुन्हा एकदा महागलं आहे. मुंबईत सोमवारी (12 जुलै) पेट्रोल 27 पैसे प्रति लिटरने महाग झाले होते. त्यानंतर, आज पुन्हा पेट्रोलचे दर वाढले असून मुंबईत आजचा (15 जुलै) पेट्रोलचा प्रति लिटर दर 107.5
मुंबई : इंधन दरवाढ रोखण्यात मोदी सरकारला अपयश येत असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने आजपर्यंतच उच्चांक गाठला आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. मुंबई, दिल्लीसह इतरही राज्यात पेट्रोल आणखी महागलं असून भोपाळमध्ये सर्वाधिक 109.89 रुपये म्हणजेच 110 रुपये लिटरवर पोहोचलं आहे.
मुंबईमध्ये पेट्रोल पुन्हा एकदा महागलं आहे. मुंबईत सोमवारी (12 जुलै) पेट्रोल 27 पैसे प्रति लिटरने महाग झाले होते. त्यानंतर, आज पुन्हा पेट्रोलचे दर वाढले असून मुंबईत आजचा (15 जुलै) पेट्रोलचा प्रति लिटर दर 107.54 तर डिझेलचच्या दरातही वाढ झाली असून डिझेल 97.45 रुपयांवर पोहोचले आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 101.54 रुपये आणि 89.87 रुपये मोजावे लागत आहेत. तर कोलकातामध्ये लोकांना पेट्रोलसाठी 101.74 रुपये आणि डिझेलसाठी 93.02 रुपये मोजावे लागतील. दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-कश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लद्दाख आणि सिक्किममध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे.
The price of petrol & diesel in #Delhi is at Rs 101.54 per litre & Rs 89.87 per litre respectively today.
— ANI (@ANI) July 15, 2021
Petrol & diesel prices per litre - Rs 107.54 & Rs 97.45 in #Mumbai; Rs 109.89 & Rs 98.67 in #Bhopal; Rs 101.74 & Rs 93.02 in #Kolkata respectively pic.twitter.com/rcJlEbhCaz
देशातील वाढत्या महागाईवरुन शिवसेनेनं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जगायचं कसं? असा प्रश्न शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनातून विचारण्यात आला आहे. तसेच, आंदोलनकारी आता कुठं गेले, असा सवालही विचारला आहे. बहुत हो गई महंगाई की मार... या घोषवाक्यावरुनही मोदी सरकारला लक्ष्य केलंय.
जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार
पेट्रोल, डिझेलचे दर रोजच वाढत आहेत. स्वयंपाकाच्या गॅसचे दरही भडकत आहेत आणि आजपासून तर सीएनजीच्या किमतीमध्येही किलोमागे 2.58 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर एक किलो सीएनजीची किंमत 52 रुपयांच्या घरात पोहोचली आहे. सर्वसामान्य जनतेसाठी सीएनजीची ही दरवाढ म्हणजे मोठाच झटका आहे. सीएनजीसोबतच घरगुती पाइपलाइन गॅसची किंमतही प्रत्येक युनिटमागे 55 पैशांनी वाढविण्यात आली आहे. आधीच कोरोनाच्या संकटात होरपळून निघालेल्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे.
भाजपा नेत्याचं असंवेदनशील वक्तव्य
देशातील जनता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे होरपळली आहे. त्यात दिलासा देण्याऐवजी मध्यप्रदेशातील मंत्री ओमप्रकाश सकलेचा यांनी जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे वक्तव्य केले आहे. आता त्रास होत आहे. मात्र, त्याशिवाय आनंद उपभोगता येणार नाही, असे सकलेचा म्हणाले. देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी पूर्ण केली आहे. प्रमुख शहरांमध्येही पेट्रोलचे दर शंभर रुपये प्रति लिटरहून अधिक आहेत. काही राज्यांमध्ये पेट्रोलसोबतच डिझेलच्या दरांनीही शतक पूर्ण केले आहे. त्यामुळे महागाईदेखील आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत जनतेला दिलासा देण्याऐवजी महागाईच्या जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे वक्तव्य सकलेचा यांनी केले.