पेट्रोल अन् डिझेल स्वस्त, पण सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 08:37 AM2022-05-22T08:37:41+5:302022-05-22T08:38:37+5:30
सीएनजीची किंमत ७३.६१ रुपयावरून वाढवून ७५.६१ रुपये प्रतिकिलो करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानीमध्ये शनिवारी सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ रुपयाची वाढ करण्यात आली. मागील दोन महिन्यातील ही १३ वी दरवाढ ठरली आहे. सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडच्या (आयजीएल) वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसर (एनसीआर) येथील सीएनजीची किंमत ७३.६१ रुपयावरून वाढवून ७५.६१ रुपये प्रतिकिलो करण्यात आली आहे.
एकीकडे इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे हाेरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने माेठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घाेषणा केली. तसेच उज्ज्वला याेजनेतील लाभार्थ्यांना घरगुती गॅसवर प्रति सिलिंडर २०० रुपये अनुदान देण्याचेही सरकारने जाहीर केले. याशिवाय किमती कमी करण्यासाठी काही उत्पादनांवरील आयात शुल्कातही कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, दुसरीकडे सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.