Petrol-Diesel Price: पेट्रोल, डिझेलवर लवकरच महत्वाचा निर्णय होणार? मोदींच्या दोन मंत्रालयांमध्ये चर्चा सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 06:43 PM2022-04-11T18:43:06+5:302022-04-11T18:44:45+5:30
Petrol-Diesel Price Hike: ७ एप्रिलपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मात्र, गेल्या २२ मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत पेट्रोल डिझेलच्या दरात 10 रुपये प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारने इंधनाचे वाढलेले दर कमी केले होते. परंतू चार महिन्यांत निवडणुका संपताच याच इंधनाने सामान्यांचे दिवाळे काढण्यास सुरुवात केली आहे. यावर आता मोदी सरकारची दोन महत्वाची मंत्रालये चर्चा करत असून लवकरच दिलासादायक बातमी येण्याची शक्यता आहे.
असे झाले तर देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमतींमध्ये कपात केली जाणार आहे. पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये कपात करण्यावर चर्चा करत आहेत. केंद्राने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये देखील एक्साईज ड्युटीमध्ये कपात केली होती. तेव्हा सरकारने पेट्रोल ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांचा कर कमी केला होता. सध्या पेट्रोलवर एक्साईज ड्युटी 27.90 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 21.80 रुपये आकारली जाते.
७ एप्रिलपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मात्र, गेल्या २२ मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत पेट्रोल डिझेलच्या दरात 10 रुपये प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. यामुळे महागाई देखील वाढू लागली आहे. दुधापासुन सर्व पदार्थांच्या दरात, भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
सीएनजी, गॅस सिलिंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. यामुळे प्रवासासोबतच नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा खर्चही वाढला आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.