कमी कसले होतेय, या राज्यात पेट्रोल, डिझेल महागले; दर ९० पैशांनी वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 12:32 PM2023-06-11T12:32:17+5:302023-06-11T12:32:38+5:30
petrol and diesel rate: पुढील वर्षी लोकसभा निवडणूक आहे. मार्च एप्रिलमध्ये याची घोषणा होऊ शकते. यामुळे त्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होऊनही देशात पेट्रोल, डिझेल चढेच राहिलेले दर कमी करण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी पेट्रोल, डिझेल विक्री करणाऱ्या कंपन्यांना नफा झाल्याचे वृत्त आले होते. यामुळे याचा फायदा या कंपन्या ग्राहकांना येत्या काही महिन्यांत पोहोचवतील अशीही चर्चा होती. परंतू, कंपन्याच नाही तर केंद्र सरकार आणि राज्ये देखील यासाठी तयार नसल्याचे दिसत आहेत.
पुढील वर्षी लोकसभा निवडणूक आहे. मार्च एप्रिलमध्ये याची घोषणा होऊ शकते. यामुळे त्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होऊनही देशात पेट्रोल, डिझेल चढेच राहिलेले दर कमी करण्याची शक्यता आहे. या दर कपातीची नुसती चर्चा असताना पंजाबमधील लोकांना दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत.
पंजाबच्या भगवंत मान सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट वाढविला आहे. यामुळे पेट्रोलचा दर 98.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर 88.95 रुपये प्रति लीटर झाला आहे. दर लीटरमागे ९० पैशांचा कर वाढविण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या फेब्रुवारीलाच पंजाबमध्ये व्हॅट वाढविण्यात आला होता.
मोफत वीज, मोफत रेशन आदी घोषणा देणारे पंजाब राज्याच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. केंद्राकडे मदत मागितली परंतू तिकडून काहीही होकार आलेला नाहीय. यामुळे मान सरकारला दरवाढ करावी लागत आहे. हा व्हॅट वाढविल्याने पंजाब सरकारला अतिरिक्त ४०० कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे.
शुक्रवारी पंजाब कॅबिनेटने गुपचूपरित्या व्हॅटमध्ये वाढ केली. शनिवारी रात्री उशिरा याचे नोटीफिकेशन जारी करण्यात आले. यामुळे हे नवे दर शनिवारी रात्रीपासूनच लागू झाले आहेत. यामुळे जवळपास १ रुपयांची वाढ झाली आहे.