जाणून घ्या, का वाढलेत पेट्रोलचे भाव, कशामुळे पडतोय तुमच्या खिशावर भार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 12:42 PM2018-05-21T12:42:50+5:302018-05-21T14:23:59+5:30
पेट्रोलच्या दरांनी गाठला गेल्या 16 वर्षांमधील उच्चांक
मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले दर आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दर विक्रमी उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. मुंबईत आज पेट्रोलचा दर 84.40 रुपये प्रति लिटर इतका आहे. तर डिझेलचा दर 72.21 प्रति लिटरवर जाऊन पोहोचला आहे. याआधी सप्टेंबर 2013 मध्ये पेट्रोलचा दर 84.07 रुपये प्रति लिटर इतका होता.
गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होत आहे. गेल्या वर्षी डिझेलचा दर दिल्लीत 67.57 रुपये, कोलकात्यात 70.12 रुपये, मुंबईत 71.94 रुपये आणि चेन्नईत 71.32 रुपये असा होता. दिल्लीचा विचार केल्यास 1 जुलैपासून पेट्रोलच्या दरात 13.15 रुपये, तर डिझेलच्या दरात 14.24 रुपये इतकी वाढ झाली आहे. या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दरात दोन तृतीयांश वाढ झाली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 80 डॉलर प्रति लिटरवर पोहोचले आहेत.
कशामुळे वाढल्या किमती?
उत्पादनात झालेली घट: पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओपेकनं (पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना) कच्च्या तेलाचं उत्पादन कमी केलं आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनावर विपरित परिणाम झाला आहे. जगभरात इंधनाच्या मागणीत झालेली वाढ, सौदी अरेबियाच्या नेतृत्त्वाखाली तेल उत्पादक देशांनी कमी केलेलं उत्पादन, व्हेनेझुएलामधील तेल उत्पादनात झालेली घट आणि अमेरिकेनं इराणवर लादलेले निर्बंध यामुळे तेलाचे दर भडकले आहेत.
कंपन्यांकडून नुकसान भरपाई सुरु: सरकारी पेट्रोलियम कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि चलन विनियम दर लक्षात घेऊन दररोज पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये बदल करतात. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आधी भाववाढ तात्पुरती रोखण्यात आली होती. या काळात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी मतदान होताच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली.
कर्नाटक निवडणुकीनंतर दरांमध्ये वाढ: 12 मे रोजी कर्नाटक विधासनभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यानंतर 14 मेपासून पेट्रोल दरात 1.61 रुपये प्रति लिटर, तर डिझेलच्या दरात 1.64 रुपये प्रति लिटर इतकी वाढ झाली आहे. इंधन दरांमध्ये वाढ झाल्यानं महागाईदेखील वाढली आहे.
मुंबईत इंधन दर देशात सर्वाधिक: देशातील सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळतंय. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 84.40 रुपये इतका होता. देशातील कोणत्याही भागात सध्या पेट्रोलचा दर इतका नाही.
पेट्रोल, डिझेलच्या दर विक्रमी उंचीवर: गेल्या 16 वर्षांमधील किमती विचारात घेतल्यास 14 सप्टेंबर 2003 रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर 76.06 रुपये प्रति लिटर इतका होता. मात्र गेल्या 16 वर्षांमधील पेट्रोल, डिझेलच्या दरांचा हा विक्रम आता मोडीत निघाला.
किमतींमध्ये करांचा किती वाटा?: पेट्रोलच्या किमतींचा विचार केल्यास त्यातील 50 टक्क्यांहून अधिक रक्कम राज्य आणि केंद्र सरकारनं लावलेल्या विविध करांमुळे द्यावी लागते. डिझेलच्या बाबतीत हे प्रमाण 40 टक्क्यांहून जास्त आहे.