पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात
By admin | Published: June 15, 2017 08:44 PM2017-06-15T20:44:31+5:302017-06-15T20:49:23+5:30
पेट्रोलचे दर प्रतिलिटर 1 रुपये 12 पैसे आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 1 रुपये 24 पैशांनी स्वस्त झाले आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - पेट्रोलचे दर प्रतिलिटर 1 रुपये 12 पैसे आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 1 रुपये 24 पैशांनी स्वस्त झाले आहेत. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या दर 15 दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात आणि त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीच्या कमी झाल्यानं ही दरकपात करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांसाठी काहीशी दिलासादायक गोष्ट आहे.
तत्पूर्वी देशभर पेट्रोलचे दररोज बदलण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात 16 जूनपासून पेट्रोल पंप चालकांनी पुकारलेला संप मागे घेतला होता. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पेट्रोल पंप चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. सरकारने घेतलेला निर्णय एकतर्फी असल्यामुळे तो आम्हाला मान्य नाही, असे म्हणत पेट्रोल पंप मालकांनी 16 जूनपासून संप पुकारला होता. सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून 16 जूनपासून पेट्रेल व डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, आता हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पाहून आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल इंधनाच्या किमतीचा आढावा दर दोन आठवड्यांनी घेतात. पुद्दुचेरी, चंदीगढ, जमशेदपूर, उदयपूर आणि विशाखापट्टणम येथे पेट्रोलच्या किमती रोजच्या रोज बदलण्याचा 1 मेपासून करण्यात आलेला प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर तो देशभर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सद्यस्थितीला भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन तेल कंपन्या दर 15 दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात. या तीन कंपन्यांचे इंधन बाजारावर 95 टक्के नियंत्रण असून, त्यांचे देशभरात जवळपास 58 हजार पेट्रोल पंप आहेत. विकसित देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलले जातात. यामुळे तेल कंपन्यांचे नुकसानाचे प्रमाण कमी होईल असा दावा केला गेला होता.