Petrol-Diesel Price: 'जोर का झटका धीरे से'! 80,80,80,80,50,30...; अशा वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 03:17 PM2022-03-28T15:17:46+5:302022-03-28T15:18:48+5:30
Fuel Price Hike: निवडणुकीत नुकसान होण्याच्या भीतीने त्यावेळी भाव वाढवले नाहीत आणि आता तेलाचा बोजा सर्वसामान्यांवर टाकत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
नवी दिल्ली: सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या आठवडाभरात पेट्रोल चार आणि डिझेल 4.30 रुपयांनी महागले आहे. तेल कंपन्या सामान्यांना जोराचा धक्का हळूच देत असल्याचे दिसत आहे. कदाचित याच कारणामुळे एकदम भाववाढ करण्याऐवजी दररोज भाववाढ केली जात आहे. गेल्या 7 दिवसात तेलाच्या किमती 6 वेळा वाढल्या आहेत.
आज 28 मार्च 2022 म्हणजेच सोमवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 30 पैशांनी तर डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलचा दर 99.41 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे, तर डिझेलचा दर 90.77 रुपये प्रति लिटर झाला आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे.
तेलाच्या किमती वाढल्या
तेल कंपन्या हळूहळू पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत आहेत. 22 ते 28 मार्च बद्दल बोलायचे तर 24 मार्चलाच भाव स्थिर राहिला. 22 मार्च रोजी पेट्रोलच्या दरात 80 पैशांनी, 23 मार्चला 80 पैशांनी, 25 मार्चला 80 पैशांनी, 26 मार्चला 80 पैशांनी, 27 मार्चला 50 पैशांनी आणि 28 मार्चला 30 पैशांनी वाढ झाली.
अशाप्रकारे एका आठवड्यात पेट्रोल चार रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर डिझेलच्या दरात 22 मार्चला 80 पैशांनी, 23 मार्चला 80 पैशांनी, 25 मार्चला 80 पैशांनी, 26 मार्चला 80 पैशांनी, 27 मार्चला 55 पैशांनी आणि 28 मार्चला 55 पैशांनी वाढ झाली आहे. म्हणजेच एका आठवड्यात डिझेल 4.30 रुपयांनी महागले आहे.
सरकारने काय दिले?
तेलाच्या वाढत्या किमतींवर विरोधी पक्ष आधीच हल्लाबोल करत आहेत. निवडणुकीत नुकसान होण्याच्या भीतीने त्यावेळी भाव वाढवले नाहीत आणि आता सरकार महाग तेलाचा बोजा सर्वसामान्यांवर टाकत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याचबरोबर महागड्या तेलावरही सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासाठी रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला जबाबदार धरले आहे. अनुराग ठाकूर यांच्या मते, युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला असून त्याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थेवर झाला आहे. तर, केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा तेलाच्या किमतीवर परिणाम झाला आहे. सरकारने ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती निर्माण केलेली नाही. किमतीचा निवडणुकीशी काहीही संबंध नसून पराभवाच्या निराशेने विरोधक असे आरोप करत आहेत, असे मंत्री म्हणाले.