पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच; मुंबईत उच्चांक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 05:59 AM2021-02-10T05:59:29+5:302021-02-10T05:59:49+5:30
आंतरराष्ट्रीय दर आणि विदेशी चलनाचा विनिमय दर यानुसार दोन्ही इंधनाचे दर ठरविले जातात. जागतिक बाजारातही कच्चा तेलाचे दर १३ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.
नवी दिल्ली : तेल वितरण कंपन्यांनी केलेल्या दरवाढीनंतर मंगळवारी पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा नव्या उच्चांकावर पोहोचले. भारतीय तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल- डिझेलच्या दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ केली आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ८७.३० रुपये लिटर, तर डिझेलचे दर ७७.४८ रुपये लिटर झाले. मुंबईत पेट्रोल ९३.८३ रुपये लिटर, तर डिझेल ८४.३६ रुपये लिटर झाले.
भारतातील पेट्रोल- डिझेलच्या दरांचा दररोज आढावा घेतला जातो. आंतरराष्ट्रीय दर आणि विदेशी चलनाचा विनिमय दर यानुसार दोन्ही इंधनाचे दर ठरविले जातात. जागतिक बाजारातही कच्चा तेलाचे दर १३ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. काही मोठ्या तेल उत्पादकांनी तेल पुरवठ्यात कपात केली आहे. तसेच तेल बाजारात मागणी वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले, असे सूत्रांनी सांगितले.
एप्रिलच्या डिलिव्हरीसाठी ब्रेंट क्रूडचे दर २९ सेन्टसनी अथवा ०.५ टक्क्याने वाढून ६०.८५ डॉलर प्रति बॅरल झाले. सूत्रांनी सांगितले की, सौदी अरेबियाने फेब्रुवारी आणि मार्चच्या तेल पुरवठ्यात अतिरिक्त कपात केली आहे. ओपेक देशांनी आधीच केलेल्या पुरवठा कपातीच्या व्यतिरिक्त ही कपात आहे. या निर्णयामुळे जागतिक तेल बाजारातील तेल पुरवठा खालावला आहे.